मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात. लाइक्स, शेअर्स, कमेंट्सच्या या दुनियेत बऱ्याच व्हिडिओंचा विसरही पडतो. पण, त्यातही काही युट्यूबर मात्र प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरतात. अशाच युट्यूबर्सच्या यादीतील एक नाव म्हणजे मस्तनम्मा.
सर्वात वयोवृद्ध युट्यूबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंद्रीकेशरी मस्तनम्मा यांचं बुधवारी निधन झालं. वयाच्या १०७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुळच्या आंध्रप्रदेशच्या असणाऱ्या मस्तनम्मा यांनी त्यांच्या पाककलेची सुरेख आणि तितकीच सोपी शैली सर्वांसमोर ठेवत ही कला साऱ्या जगापर्यंत पोहोचवली.
'एग डोसा' म्हणू नका किंवा मग साधी सोपी भाजी म्हणू नका. हाताशी उपलब्ध साधन आणि सामग्रीचा वापर करत चवदार पदार्थ बनवणाऱ्या या आजीबाईंचा उत्साह तरुणाईलाही लाजवेल असाच होता.
मुख्य म्हणजे अमुक एक पदार्थ बनवतेवेळी त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद, उत्साह आणि शेवटी तो पदार्थ पूर्ण झाल्यानंतरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना या शब्दांत व्यक्त करता येणं निव्वळ अशक्य. आज मस्तनम्मा आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या व्हिडिओ आणि पाककौशल्याच्या माध्यमातून त्या नेहमीच सर्वांसोबत असतील, असं म्हणत नेटकऱ्यांनी या लाडक्या आजींना श्रद्धांजली वाहिली आहे.