कलाजगताने गमावले दिग्गज दिग्दर्शक; K. Viswanath यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

K. Viswanath यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Updated: Feb 3, 2023, 10:49 AM IST
कलाजगताने गमावले दिग्गज दिग्दर्शक; K. Viswanath यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन title=

K. Viswanath Death News : तेलगू चित्रपटांचे दिग्दर्शक के विश्वनाथ (K. Viswanath) यांचे निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीर्घ आजाराला झुंज देत होते. हैद्राबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 92 व्या वर्षी के विश्वनाथ यांची प्राण ज्योत मालावली आहे. 2016 साली के विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Falke Award) सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. 

के विश्वनाथ यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असता अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. RRR अभिनेता ज्युनियर एनटीआरनं (Jr. NTR) ट्विटरवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. अभिनेते अनिल कपूर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले, "के. विश्वनाथजी मला तुम्ही अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. ईश्वर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सेटवर तुमच्यासोबत मला मंदिरात असल्यासारखे वाटत होते." तर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. फक्त भारतीय कलाकार नाही तर परदेशातूनही अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 

विश्वननाथ यांनी फक्त तेलगु चित्रपटसृष्टी नाही तर त्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ईश्वर, संजोग, सूर सरगम, कामचोर, जाग उठा इंसान, संगीत अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. विश्वनाथ यांच्या सहा दशकाच्या करिअरमध्ये त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 10 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1992 साली विश्वनाथ यांना चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. 

के. विश्वनाथ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी गुंटूर जिल्ह्यात झाला. 1965 मध्ये 'आत्मा गौरवम' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच निर्माता होण्यापूर्वी ते एक उत्कृष्ट अभिनेता देखील होते