न्यूयॉर्क : अमेरिकेची प्रसिद्ध फॅशन डिझायनर केट स्पेड मंगळवारी आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडली. न्यूयॉर्क पोलिसांनी आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या हाती केटनं आत्महत्येपूर्वी आपल्या १३ वर्षांच्या मुलीसाठी एक सुसाईड नोट लागलीय. आपल्या मृत्यूसाठी स्वत:ला जबाबदार न मानता याचं कारण आपल्या वडिलांना विचारण्याचं तिनं आपल्या मुलीला या पत्रातून म्हटलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, केट आणि एन्डी यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं होतं.
केटची बहिण रेटा सैफो हिच्या म्हणण्यानुसार, केट काही काळापासून मानसिक त्रासातून जात होती. परंतु, तिनं यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात निष्काळजीपणा केला.
५५ वर्षीय स्पेडनं आपल्या करिअरची सुरुवात एक पत्रकार म्हणून केली होती. ८० च्या दशकात मॅनहॅटनमध्ये महिलांवर आधारित मॅगझिन 'Mademoiselle' मध्येही तीनं काम केलं होतं.
त्यानंतर १९९३ मध्ये तीनं पती एन्डीसोबत 'एपानमस' फॅशन ब्रान्डची सुरुवात केली. केटनं हॅन्डबॅग व्यवसायातही आपला दबदबा निर्माण केला होता. एन्डी आणि केटनं १९९४ मध्ये विवाह केला होता. त्यानंतर त्यांनी कपडे आणि ज्वेलरीमध्येही आपला व्यावसाय वाढवला होता.