मुंबई : सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रायनवर त्याच्या आईच्या हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे. हा अभिनेता नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो 'रिव्हरडेल'मध्ये दिसला आहे. रायन ग्रँथमने सहा महिन्यांपूर्वी आपल्या आईच्या हत्येप्रकरणी न्यायालयासमोर गुन्हा कबूल केला होता. या प्रकरणी आता अभिनेत्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हॉलिवूड अभिनेत्याला जन्मठेपेची शिक्षा
रायन ग्रँथमला शिक्षा सुनावताना त्याच्यासाठी काही महत्त्वाचे न्यायालयीन आदेश देण्यात आले आहेत. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, रायनला यापुढे आयुष्यात बंदूक वापरता येणार नाही. याशिवाय 14 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका होणार नाही. कॅनडातील व्हँकुव्हर येथील ब्रिटिश कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने रायन ग्रँथमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
रायन ग्रँथमने 64 वर्षीय आईची हत्या केली होती
मार्च 2020 मध्ये अभिनेत्याने आपल्या 64 वर्षीय आईची गोळ्या घालून हत्या केली होती. जेव्हा अभिनेत्याने तिच्या आईला गोळी मारली तेव्हा ती पियानो वाजवत होती. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती कॅथलीन केर यांनी न्यायालयाचा निर्णय देताना ही घटना दुःखद, हृदयद्रावक आणि जीवघेणी असल्याचं वर्णन केलं.
अभिनेत्याने या घटनेचा एक व्हिडिओ देखील बनवला होता. ज्यामध्ये तो तिच्या आईच्या मृतदेहाजवळ उभा होता आणि त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली देताना दिसत होता. व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसत आहे की, 'मी तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी झाडली. तिला समजलं की मी हे केले आहे.
आईची हत्या केल्यानंतर रायन ग्रँथम पूर्ण तयारीनिशी दुसऱ्या हत्येसाठी बाहेर पडला. या अभिनेत्याने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मारण्याची योजनाही आखली होती. ज्याचा उल्लेख त्याने आपल्या डायरीत केला होता. तथापि, अभिनेत्याने तसं केलं नाही आणि स्वत: ला व्हँकुव्हर पोलिसांच्या स्वाधीन केलं.