Sonu Nigam Apologies : सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोनू निगमचं नाव न घेता एका पाकिस्तानी गायकाने गाणं चोरीचा आरोप केला होता. पाकिस्तानी गायक ओमर नदीम (Omer Nadeem) याने केलेल्या आरोपांवर आता सोनू निगम याने मौन सोडलं आहे. सोनू निगम याने उमरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत आपली बाजू मांडली. त्याचबरोबर सोनूने पाकिस्तानी गायकाची माफी देखील (Sonu Nigam Apologies Omer Nadeem) मागितली आहे. नेमकं प्रकरण काय होतं? सोनू निगम याने माफी का मागितली? पाहुया...
नेमकं काय झालं?
पाकिस्तानी गायक उमर नदीम याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. या पोस्टमध्ये उमरने गाणं चोरी केल्याचा आरोप कोणाचंही नाव न घेता केला. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. सोनू निगमचं नवीन गाणं ‘सून जरा’ आणि उमर नदीमच्या गाण्यात साम्य आढल्याने पाकिस्तानी ट्रोलर्सने सोनू निगमला धारेवर धरलं. किमान कलाकाराला श्रेय तरी द्यायला हवं, असं उमर नदीम म्हणाला होता. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये दोन्ही कलाकारांनी प्रतिक्रिया दिली.
माझा सून जरा या गाण्याशी काहीही संबंध नाही. दुबईत मला माझे शेजारी असलेल्या केआरके (कमाल आर खान) यांनी गाण्याची विनंती केली होती आणि त्यामुळे मी ते गाणं गायलं. मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. मी फार क्वचित गाणं असं गातो. जर मी उमरचं गाणं ऐकलं असतं तर मी हे गाणं कधीच गायलं नसतं, असं सोनू निगम याने म्हटलं आहे. सोनूच्या या उत्तरावर नदीमने प्रतिक्रिया दिली. मी तुमची गाणी ऐकत मोठा झालो आहे आणि तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. तुम्ही चोरी केली, असं मी म्हटलेलं नाही. पण या बातमीने नेहमीप्रमाणे वेगळं वळण घेतलं. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, असं नदीम म्हणाला. त्यावर सोनू असं काही म्हणाला की, त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे.
दरम्यान, मला वाईट वाटतंय की मी तूझं गाणं आत्तापर्यंत ऐकलं नव्हतं. तू हे गाणं माझ्यापेक्षा खूप छान गायलं आहे. मी ते आता ऐकलं, खूप छान गाणं आहे. तुला खूप खूप आशीर्वाद आणि तुला प्रेम मिळो, असं सोनू निगमने म्हटलंय. तर तुमच्यापेक्षा चांगला गायक कोणीही नाही. मी तुमचा खूप आदर करतो, असं उमरने उत्तर दिलं आहे.