Farhan Akhtar : कलाविश्वामध्ये अनेक कलाकार हे अष्टपैलू असतात. कलेप्रती या कलाकारांची असणारी ओढ कलाकारांकडून बरीच कामं करून घेते. अशाच अष्ट्पैलू कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता फरहान अख्तरचं. गायक, संगीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता इतकंच नव्हे तर चित्रपट निर्माता अशी फरहानची ओळख. चित्रपट जगतामध्ये सराईतासारखा वावरणारा हाच फरहान तरुणाईला किंबहुना कोणत्याही पिढीला आपलासा वाटतो तो म्हणजे त्याच्या प्रभावी व्यक्तीमत्त्वांमुळं.
कैक वर्षांपूर्वी त्याच्या दिग्दर्शनात साकारलेला ''दिल चाहता है'' हा चित्रपट काळाच्या नेमका किती पुढे होता याची प्रचिती आज होते असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. गोवा, मित्रमंडळी, मैत्री, प्रेम आणि तरुण वयातील आयुष्य अशा अनेक गोष्टी त्यानं या चित्रपटात साकारल्या. मुळात हा चित्रपच पूर्णपणे काल्पनिक नसून, त्यातील एक पात्र फरहानच्या मनाच्या अतिशय जवळचं. किंबहुना फक्त या पात्राचा चेहरा बदलला तर, त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाला फरहान प्रत्यक्षात सामोरा गेला होता. हा प्रसंग म्हणजे गोव्यातलं ब्रेकअप.
'दिल चाहता है' (Dil Chahta hai) या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान यानं साकारलेली 'समीर' ही व्यक्तिरेखा आठवतेय तुम्हाला ? गोव्यात जाऊन कल्ला करणारा समीर प्रत्यक्षात तिथून परतला तेव्हा मात्र त्याचा चेहरा वेगळंच सांगत होता आणि हे सर्व प्रत्यक्षात फरहानसोबतही घडलं होतं.
'मडगांव एक्सप्रेस' या चित्रपटाच्या निमित्तानं निर्माता म्हणून एका माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत फरहाननं त्याच्या गोवा सहलीतील भयंकर अनुभव सांगितला. 'त्यावेळी मी ज्या मुलीला डेट करत होतो तेव्हा तिनं मला सोडलं होतं. आम्ही तिथं होतो तेव्हाच प्रेयसीनं माझ्याशी ब्रेकअप केलं आणि तिथून मी कार चालवत एकटाच परतलो. तो मी आतापर्यंत एकट्यानं केलेला प्रवास होता. प्रेम करणारी व्यक्ती सोबत असेल तर आपल्याला खूप छान वाटतं. पण, अचानकच तुम्हाला एकटं पडावं लागतं आणि तुमची प्लेलिस्टच बदलून जाते', असं फरहान म्हणाला.
गोव्यात हरवलेल्य़ा प्रेमाविषयी बोलताना फरहान जीवनाच्या त्या टप्प्यावरून खूप काही शिकून पुढे आला आणि त्यानं कालांतरानं प्रत्यक्ष चित्रपट साकारताना याच प्रसंगावर आधारित दृश्यही साकारलं. आजही 'दिल चाहता हैं' मधील सैफ अली खाननं साकारलेला समीर, त्याचा अल्लड स्वभाव आणि गोव्यामध्ये त्याचा होणारा ब्रेकअप आणि त्यानंतर चित्रपटाला मिळणारं वळण या सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.