'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या कुटुंबियांची आमिर खानने घेतली भेट, फोटो पाहून चाहते भावूक

सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात आमिर खान अभिनेत्री सुहानी भटनागरच्या फोटोबरोबर उभा असलेला दिसतोय. याशिवाय सुहानीचे वडिल पुनीत आणि आई पूजा भटनागरही दिसत आहेत. 

राजीव कासले | Updated: Feb 23, 2024, 04:54 PM IST
'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या कुटुंबियांची आमिर खानने घेतली भेट, फोटो पाहून चाहते भावूक title=

Suhani Bhatnagar Death : अभिनेता आमिर (Aamir Khan) खानच्या 'दंगल' चित्रपटात छोट्या बबीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या सुहानी भटनागरचा (Suhani Bhatnagar) वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालं. सुहानीला डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) या आजाराने ग्रस्त होती, तिच्यावर दिल्लीतल्य एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दोन महिने सुहानी या आजाराने पीडित होती. अखेर 16 फेब्रुवारीला तिचं निधन झालं. सुहानीच्या मृत्यूने बॉलिवूडबरोबरच तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला. आता आमिर खानने सुहानीच्या कुटुंबियांची भेट घेतली. 

सुहानीच्या कुटुंबियांची भेट
सोशल मीडियावर आमिर खानचा एक फोटो समोर आला आहे. यात आमिर खान सुहानी भटनागरच्या फोटोसोबत दिसत आहे. त्याच्याबरोबर सुहानीचे वडिल पुनीत भटनागर, आई पूजा भटनागर आणि सुहानीचा भाऊ दिसत आहेत. आमिरने सुहानीच्या कुटुंबियांची (Suhani Bhatnagar Family) भेट घेत  शोक व्यक्त केला. आमिर आणि सुहानीच्या कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुहानीच्या कुटुंबियांचा आरोप
सुहानीला योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सुहानी भटनागरच्या पायाला फ्रॅक्टर झालं होतं. यावर उपचार करण्यात आले. पण तिला जी औषधं देण्यात आली होती, त्याची रिअॅक्शन तिच्या शरीरावल झाली. सुहानीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूच्या दोन महिने आधी सुहानीच्या हाताला सूज झाली. आणि त्यानंतर पूर्ण शरीरावर सूज आली. 

उपचारादरम्यान मृत्यू
संपूर्ण शरीर सूजल्याने सुहानीला डॉक्टरकडे नेण्यात आलं. पण डॉक्टर आजाराचं निदान करु शकले नाही. पण सुहानीची तब्येत बिघडल्याने 6 फेब्रुवारीला तिला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्या शरीराच्या चाचण्या करण्यात आल्या. यात सुहानीला डर्मेटोमायोसाइटिस नावाचा आजार झाल्याचं समजलं. हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारावर केवळ स्टेरॉइड्स देऊन उपचार केले जातात. सुहानीलाही स्टेरॉइड्स देण्यात आले. पण त्यामुळे सुहानीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली. 

डर्मेटोमायोसाइटिस आजारातून पूर्णपणे बरं होण्यासाठी बराच अवधी लागतो. पण सुहानीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने तिची फुफ्फुसही कमकुवत झाली होती. यामुळे तिच्या फुफ्फुसात पाणी भरलं आणि तिला श्वाच्छोश्वास करण्यास त्रास होऊ लागला. अखेर 16 फेब्रुवारीला सुहानीचा मृत्यू झाला.

सुहानीवर कुटुंबियांना गर्व
आई पूजा भटनागरने आम्हाला सुहानीवर गर्व असल्याचं म्हटलं. लहानपणापासूनच सुहानी काही प्रोडक्टसाटी मॉडलिंग करत होती. 'दंगल'साठी 25 हजार मुलांमधून सुहानीची निवड झाली. 19 वर्षांच्या सुहानीने दंगल चित्रपटानंतर काही जाहीरातीतही काम केलं. पण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तीने अभिनयातून ब्रेक घेतला होता.