मुंबई : बॅडमिंटनपटू सायन नेहवालच्या ( Saina Nehwal ) जीवनप्रवासावर आधारित सायना सिनेमा ( Saina Movie ) २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) ही सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या भूमिकेसाठी सगळ्यात पहिले निवड झालेली ती अभिनेत्री श्रद्धा कपूरची. खरतर हा चित्रपट श्रद्धा कपूरच्या ( Shraddha Kapoor ) करिअरमधला एक मोठा टप्पा ठरला असता, मात्र श्रद्धाने हा सिनेमा का सोडला, याचा उलगडा अद्याप झालेला नव्हता.
अखेर या सिनेमाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी ह्यामागचं खरं कारण सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा कपूर हा रोल का करू शकली नाही, याची माहिती त्यांनी दिली.
काय म्हणाले दिग्दर्शक अमोल गुप्ते?
"श्रद्धाने या रोलसाठी प्रचंड तयारी केली होती. आणि म्हणूनच तिच्यासोबत आम्ही शूटिंगला सुरूवातही केली. मात्र मध्ये तिला डेंग्यू झाला. त्यावेळीही ती परत आल्यावर शूटिंगला सुरूवात होईल, अशा आशेत आम्ही होतो. मात्र महिना झाला तरी ठीक वाटत नसल्याने एक दिवस श्रद्धानेच सांगितले की, तिच्यात आता ताकदच उरलेली नाही. "
त्यानंतर या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी अमोल यांना विनंती केली की, "श्रद्धाला स्ट्रीट डान्सर ३डी या सिनेमासाठी काम करायला येऊ दे, कारण त्या सिनेमासाठीही अभिनेत्रीची नितांत गरज आहे.
भूषण यांनीच पुढे परिणीतीचं नाव सूचवलं. त्यामुळे सगळ्यांच्याच हिताने हा निर्णय घेण्यात आला. भूषण, मी, परिणीती आणि श्रद्धा आम्ही सगळेच समाधानी होतो. हा सिनेमा आता रिलीज होणार, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण ५ वर्षे या सिनेमावर मी काम करत होतो."
याआधी हा प्रश्न परिणीती चोप्रालाही विचारण्यात आला होता. तेव्हाही परिणीतीने म्हटलेलं की, "श्रद्धाकडे दुसऱ्याही फिल्म्स होत्या, आणि त्यामुळे तारखांचं गणित जुळवणं कठीण जात होतं. मात्र आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी आहोत, आणि श्रद्धा ही अत्यंत गोड मुलगी आहे."