मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले. रणवीर-दीपिका काल कोकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर आज त्यांनी सिंधी पद्धतीने विवाह केला.
त्यामुळे चाहत्यांना हे दोघेही वधू-वराच्या पोशाखात नेमके कसे दिसतील, याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर रणवीर आणि दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.
पाहुण्यांना या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर रणवीर दीपिका मुंबईत परतणार आहे. मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी त्यांची जंगी रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे.
'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बी-टाऊनच्या या लोकप्रिय जोडीने त्यांच्या लग्नाचा विमाही उतरवला आहे.
१२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या दिवसांसाठीची विमा त्यांनी उतरवला आहे. 'ओरिएंटल इन्श्युरन्स' या कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आल्याचे कळते. ‘ऑल रिस्क पॉलिसी’ अंतर्गत हा विमा घेण्यात आला असून, त्या माध्यमातून विवाहसोहळ्याला संरक्षण देण्यात आले आहे.