DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार

Taylor Swift DeepFake:  एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 27, 2024, 01:36 PM IST
DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार title=

Taylor Swift DeepFake: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय जगासाठी अडचण बनत चालला आहे. भारतासहित जगभरातील लोक याला त्रस्त झाली आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडीओ आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर आलिया भट्ट, सारा तेंडुलकर यांचे डीपफेक फोटो समोर आले. एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.

प्रसिद्ध पॉप गायिका टेलर स्विफ्टचा एक डीपफेक फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे आता अमेरिकन सेलिब्रिटींनीदेखील डीपफेकचा धसका घेतला आहे. हॉलीवूडमध्ये डीपफेकबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्विफ्टच्या बनावट फोटोंनी अमेरिकन नेत्यांचे लक्ष डीपफेक्सकडे वेधले आहे. 

अशा प्रकरणांना वेळीच आळा घालण्याची, त्यावर पूर्णपणे बंदी घालावी आणि तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अमेरिकेत होऊ लागली आहे. टेलर स्विफ्टचा डीपफेक फोटे सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा फोटो फेसबुक आणि टेलिग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हे भयावह असल्याचे वर्णन अमेरिकेच्या एका खासदाराने केले आहे. 

दरम्यान फोटो शेअर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे संबंधित खासदाराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. सोशल मीडिया कंपन्यांनाही हा फोटो काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे.

डीपफेक प्रकरणे झपाट्याने वाढ

2023 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2019 पासून डीपफेकच्या घटनांमध्ये 550 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या जगातील कोणत्याही देशात डीपफेक रोखण्यासाठी कोणताही कायदा नाही. भारतात डीपफेकबाबत कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे.

रश्मिका डीपफेक प्रकरणी आरोपीला अटक 

रश्मिका मंदानाचा डीपफेक फोटे बनवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी दक्षिण भारतातून अटक केली आहे. आता त्याला दिल्लीत आणण्यात आलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे.  दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.