'स्टुडंट ऑफ द इयर २'साठी अनन्या पांडेकडून 'या' गोष्टीचा त्याग

 एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे. 

Updated: May 7, 2019, 03:23 PM IST
'स्टुडंट ऑफ द इयर २'साठी अनन्या पांडेकडून 'या' गोष्टीचा त्याग  title=

मुंबई : 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या पहिल्या भागातून ज्याप्रमाणे तीन नवे चेहरे म्हणजेच आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनचं हिंदी कलाविश्वात पदार्पण झालं होतं. त्यात पावलावर पाभल ठेवत स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटातूनही स्टारकिड्स झळकणार असून, यात एक नवा चेहराही आहे. तो चेहरा म्हणजे अनन्या पांडे हिचा. अभिनेता चंकी पांडेची मुलगी म्हणून अनन्याची ओळख होतीच. पण, आता चित्रपटाच्या निमित्ताने ती एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे. अनन्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे तो प्रदर्शित झाल्यानंतर कळणारच आहे. पण, या चित्रपटात झळकण्यासाठी अनन्याने एका गोष्टीचा किंबहुना तिच्या एका स्वप्नाचा त्याग केला आहे. 

होय. हे खरं आहे. कलाविश्वात मिळालेली ही संधी हातची जाता कामा नये यासाठी अनन्याने परदेशातील महाविद्यालयीन शिक्षणाची वाट दूर सारली आहे. खुद्द अनन्यानेचएका मुलाखतीत याविषयीची माहिती दिली. पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणं निश्चित झालेलं असतानाच अनन्याने या चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचं ठरवलं होतं. 'मी महाविद्यायीन शिक्षणासाठी जाण्यास सज्ज झाले होते. मी USC मध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणार होते. पण, जाण्यापूर्वी मी चित्रपटाची ऑडिशन देऊ इच्छितच होते. नशिबाची किमया पाहा, ही संधी मला मिळाली आणि माझं स्वप्न साकार झालं', असं अनन्या म्हणाली. 'स्टुडंट ऑफ द इयर २'मध्ये काम करण्याची संधी मिळण्याचा आनंद तिच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. 

 
 
 
 

A post shared by Ananya (@ananyapanday) on

येत्या काही दिवसांमध्येच अनन्या एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. पण, त्यापूर्वीच तिच्या या कलेची प्रशंसा होण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून अनन्या साकारत असणाऱ्या भूमिकेची झलक सिनेरसिकांना पाहता आली. ज्यानंतर तिच्या भूमिकेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है.....', असं म्हणतात ना ते अनन्याच्या बाबतीत बऱ्याच अंशी खरंही ठरलं. हो, पण या साऱ्याची तिला खंत नाही. उलटपक्षी एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं ही एक अतिशय मोठी बाब असल्याचं म्हणत ती पुढील प्रवासासाठी प्रचंड आशावादी आहे.