मुंबई : गायिका kanika kapoor कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच तिच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तींची यादी तयार करत त्यांची कोरोनासाठीची चाचणी करण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने अतिरिक्त पथकं तयार करत अशा व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरु केलं. यातच आता एका क्रिकेट संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
लंडनमधून परतल्यानंतर कनिका ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्या हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील खेळाडूही थांबल्याची बाब आता समोर आली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार कनिकाच्या घराजवळील परिसरात राहणाऱ्या जवळपास २२ हजार नागरिकांना स्कॅन करण्यात आलं. तर, दुसऱ्या एका पथकाने १४ ते १६ मार्च या काळासाठी कनिका लखनऊमधील ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली होती, तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात तेली.
कनिकाने हॉटेलच्या बफेटमध्ये जेवण घेतलं. शिवाय लॉबीमध्येही ती काहीजणांना भेटली. कनिका या हॉटेलमध्ये त्याच काळात वास्तव्यास होती, जेव्हा इथे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील खेळाडूही होते. ते भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी येथे आले होते, अशी माहिती या पथकातील एका अधिकाऱ्यांनी दिल्याचं कळत आहे. दरम्यान, आता कनिका ज्या हॉटेलमध्ये होती, तेथे असणाऱ्या या खेळाडूंपैकी कोणाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हाच प्रश्न अनेकांना सतावत आहे.
पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष
दरम्यान, कनिकाला विलगीकरणाची सूचना असतानाही तिने इतरांना भेटणं सुरुच ठेवलं त्यामुळे आता तिच्या संपर्कात नेमकं कोण कोण आलं, याचाच तपास केला जात आहे. कारण, एकट्य़ा कनिकामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे तिच्या या बेजबाबदार वागण्यासाठी अनेकांनीच संताप व्यक्त केला आहे.