मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जीममध्ये व्यायाम करतेवेळी हृदयविकाराचा झटका आला. ज्यानंतर त्यांना तातडीनं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणं अपेक्षित असतानाच आता मात्र चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयामध्ये 100 टक्के ब्लॉकेज आढळल्यामुळं सध्याची परिस्थिती प्रचंड नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरीही करण्यात येणाऱ्या सर्व उपचारांना ते व्यवस्थित प्रतिसाद देत असल्यामुळं परिस्थिती नियंत्रणात येईल, अशा आशा डॉक्टरांनी बाळगल्या आहेत.
जीममध्ये खालावली प्रकृती...
बुधवारी श्रीवास्तव ज्यावेळी ट्रेडमिलवर धावत होते, तेव्हा त्यांच्या छातीत प्रचंड वेदना जाणवल्या आणि ते खाली कोसळले. सदर घटनेनंतर त्यांना लगेचच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रीवास्तव काही नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते. पण, जीममध्ये गेल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
राजू श्रीवास्तव हे फक्त एक अभिनेते, विनोदवीर नसून, ते राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. The Great Indian Laughter Challenge, Comedy Ka Maha Muqabala या कार्यक्रमांनी त्यांना विशेष ओळख दिली. 'बिग बॉस 3' आणि 'नच बलिए' या रिअॅलिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते.