Cillian Murphy in 28 Days Later Franchise : एखाद्या भूमिकेसाठी कलाकार स्वत:ला कितपत झोकून देत काम करतात याची कल्पना नसेल तर हा अभिनेता त्याचं उत्तम उदाहरण आहे. हॉलिवूड कलाविश्वामध्ये या अभिनेत्याला त्याच्या उत्तम अभिनयासमवेत भूमिकेसाठीच्या समर्पणासाठी ओळखलं जातं. या अभिनेत्याचं नाव आहे किलियन मर्फी.
जगातील पहिला अणूबॉम्ब तयार करणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर बेतलेला 'ओपनहायमर' हा चित्रपट जगभरात लोकप्रिय ठरण्यामागचं कारण होता किलियन मर्फीचा अभिनय. अतिशय ताकदीनं त्यानं या भूमिकेला न्याय दिला होता. हाच किलियन आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावेळी तो सर्वांनाच थक्क करताना दिसत आहे. बरं, किलियनची चर्चाही एका अशा चित्रपटामुळं होत आहे जिथे तो या चित्रपटात आहे की, नाही यावरूनही अद्याप पडदा उचलण्यात आलेला नाही.
किलियननं आतापर्यंत अनेकदा त्याच्या भूमिकांसाठी स्वत:वर बरंच काम केल्याचं पाहायला मिळालं. संवादकौशल्य असो किंवा अगदी शरीरयष्टी असो. मिळालेली व्यक्तीरेखा साकारण्यासाठी त्यानं कायमच स्वत:ला झोकून दिलं. आता म्हणे हाच अभिनेता '28 इयर्स लेटर' या चित्रपटातूनही झळकणार आहे. तूर्तास हा तर्क चाहत्यांनीच वर्तवला असून, चित्रपटाच्या टीमकडून अधिकृत माहिती प्रतिक्षेत आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि आश्चर्याची बाब म्हणजे यातील अर्ध्या सेकंदाच्या दृश्यानं हा किलियनच आहे असा विश्वास चाहत्यांना बसला. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या '28 डेज लेटर' या चित्रपटाच्या सीरिजमधील '28 इयर्स लेटर' हा पुढील चित्रपट असून, किलियननं यापूर्वीच्या चित्रपटातील जिम या नव्या कलाकृतीमध्ये धडकी भरवणाऱ्या रुपात सादर केल्याचं चाहते म्हणत आहेत.
खरंच या भूमिकेमध्ये किलियन दिसत असल्यास मेकअप आणि स्पेशल इफेक्ट्स असतानाची अभिनेत्याची मेहनत आणि त्यानं स्वत:च्या शरीरावर केलेलं काम नाकारता येत नाही, असंच ठाम मत चाहत्यांनी मांडलं आहे.
पाहा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ...
हल्लीच एका पॉडकास्ट शोमध्ये किलियन सहभागी झाला होता. या शोमध्ये त्यानं आपण विगन होण्याचा प्रयत्न करत असल्याचतं सांगत संपूर्ण डाएट प्लांट बेस्ड अर्थात भाज्या, फळं आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांवर आधारित असल्याचं सांगितलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे किलियननं 'ओपनहायमर'साठीसुद्धा बरंच वजन घटवलं होतं. तेव्हा आता नव्या भूमिकेसाठीसुद्धा तो असं काही करु शकतो यावर चाहत्यांचा पूर्ण विश्वास आहे.