डोंबिवलीत मराठी-अमराठी वाद! सोसायटीतल्या सत्यनारायण, हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना शिवीगाळ

Marathi Vs Non Marathi Issue In Dombivli: केवळ डोंबिवलीच नाही तर पनवलेमध्येही मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 28, 2025, 08:26 AM IST
डोंबिवलीत मराठी-अमराठी वाद! सोसायटीतल्या सत्यनारायण, हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना शिवीगाळ title=
डोंबिवलीमधील सोसायटीमध्ये राडा (सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभ फोटो प्रातिनिधिक)

Marathi Vs Non Marathi Issue In Dombivli: कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सामोर आला आहे. डोंबिवलीमधील नांदीवली येथे एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला. या अमराठी कुटुंबांनी मराठी माणसांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे. सोमवारी रात्रीचा सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

नेमकं घडलं काय?

गेल्या काही महिन्यापूर्वी कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटी मराठी विरुद्ध अमराठी वादामध्ये तुंबळ हाणामारी प्रकरणं झालं होत. हे प्रकरणं विधानसभेत गाजलं होतं. मागील काही काळात अशी अनेक प्रकरणं मुंबई, ठाणे, कल्याण , डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा अशाच वादाने तोंड वर काढल्याचं सोमवारी दिसून आलं. येथे मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला असून हा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात घडला आहे. नांदिवलीमधील 'साई कमल छाया' या इमारतीमध्ये येत्या 2 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. सोमवारी रात्रीचा सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला.

मराठी कुटुंबांचं म्हणणं काय?

याबाबत मराठी कुटुंबाने आपला आक्षेप नोंदवला आहे. "अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले", असं मराठी कुटुंबांचं म्हणणं आहे. याप्रकरणी सदर सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. 

पनवेलमध्येही मराठी कुटुंबाबरोबर दादागिरी

मराठी आणि अमराठी वाद पनवेलमध्येही पाहायला मिळाला. पनवेलमधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत परप्रांतीयाची दादागिरी झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. हिरानंदानी सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. घराचे अग्रीमेंट संपले असून दुसऱ्या घराचा शोध घेत असताना हिरानंदानीमधील घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसेचा दणका

हिरानंदानी सोसायटीच्या चेयरमन वसुंधरा शर्मा यांनी घर खाली करण्यासाठी दबाव टाकला असून दुसरं घर मिळेपर्यंत घर मालकाने राहण्याची परवानगी दिली असताना देखील सोसायटीमधील परप्रांतीय चेअरमन दबाव टाकत होती. या दबावाखाली गायकवाड कुटुंबियांतील एका जेष्ठ नागरिकाला त्रास झाला असल्याने याबाबत गायकवाड कुटुंबाने मनसेकडे दादा मागितली होती. यावेळी मनसेने परप्रांतीय चेयरमनला मनसे स्टाईलने दणका दिला. मनसेनं चेअरमनला मराठी कुटुंबियाची माफी मागायला लावली.