मुंबई : बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर 'कलंक' चित्रपट 17 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'कलंक'मध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूरने प्रमुख भूमिका साकारली आहे. 'कंलक'च्या चित्रीकरणानंतर आदित्य रॉय कपूर आणखी दोन चित्रपटात काम करण्यासाठी तयारी करत आहे. 'ओके जानू' चित्रपटानंतर आदित्य रॉय कपूर कोणत्याही चित्रपटातून दिसला नाही. याविषयी आदित्यनेच खुलासा केला आहे. करियरमध्ये दोन वर्षांचा ब्रेक त्याच्यासाठी चांगला ठरला. या वेळात त्याचा अभिनय आणखी चांगला करण्यासाठी वेळ मिळाला असल्याचं त्याने म्हटलंय.
'कलंक'मध्ये मी अशा एका व्यक्तीची भूमिका साकारत आहे जो मजबूत आहे, शांत आहे, गोंधळलेला आहे परंतु तो चित्तवेधक असल्याचं त्याने म्हटलंय. 'कलंक' दिग्दर्शक अभिषेक वर्मनकडून या भूमिकेबद्दल ऐकल्यानंतर अतिशत प्रभावित झालो होतो. 'आयएएनएस'शी बोलताना त्याने 'या भूमिकेसाठी मला काहीतरी करण्याची गरज होती. मी जेव्हा चित्रपटाच्या सेटवर असतो तेव्हा मी अतिशय आनंदी असतो. मी जेव्हा दोन वर्षांनंतर चित्रपटाचं चित्रीकरण सुरु केलं, त्यावेळी मी खुश होतो. 'कलंक'च्या आधी मी जो ब्रेक घेतला तो माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला कारण या काळात मी माझा अभिनय अधिक चांगल्याप्रकारे प्रदर्शित करण्यासाठी नवीन दृष्टिकोन मिळवला असल्याचं' त्याने म्हटलंय.
'एक कलाकार म्हणून जेव्हा आपण दररोज काम करतो तेव्हा एक वेळ अशी येते की आम्ही आमच्या सर्व भावनात्मक गोष्टी ओळखतो आणि त्यांचा वापर कसा, कुठे करायचा याबाबतही चांगली माहिती होते. काही नवं करण्यासाठी आमच्याजवळ काहीच बाकी राहत नसल्यामुळे अभिनय काहीसा बनावट वाटायला लागतो' असंही त्याने म्हटलंय.
'आशिकी 2' चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आदित्य रॉय कपूरने 'ब्रेक घेतल्यामुळे मला माझ्या अभिनयाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे आता एका पाठोपाठ एक चित्रपटांतून काम करण्यासाठी उत्साहित असल्याचंही' त्याने म्हटटलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कलंक' चित्रपटातील आदित्यच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. 'कलंक'मध्ये आदित्यने आलिया भट्टच्या पतिची भूमिका साकारली आहे. 'कलंक'मध्ये आदित्य रॉय कपूरसह माधुरी दिक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट असून प्रदर्शनानंतर 'कलंक'ची चर्चा होत आहे.