मुंबई : 'एक बार फिर से आतंक का कहेर, दिल्ली के शहेर' असं म्हणतं चित्रपटगृहात दाखल झालेल्या 'बाटला हाऊस' चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमांकावर आहे. सलग चौथ्या दिवशी १२ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर चित्रपट प्रदर्शना नंतर तीन दिवसांपर्यंत चित्रपटाने ३१.५० कोटींची कमाई केली आहे. १५ ऑगस्ट मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने ४ दिवसात तब्बल ४३.५० कोटींपर्यंत मजल मारली आहे.
अभिनेता अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटाला टक्कर देण्यात मात्र जॉन अपयशी ठरला आहे. १५ ऑगस्ट रोजी दोन्ही चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाले. त्यामध्ये 'मिशन मंगल' चित्रपटाच्या कमाईचे आकडे शंभर कोटींच्या नजीक पोहोचणार असल्याचं चित्र आहे
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती देत एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला म्हणजेच चौथ्या दिवसापर्यंत या चित्रपटाने भारतात ९७. ५६ कोटींची कमाई केली आहे.
#MissionMangal is Akshay Kumar’s biggest opener to date [opening weekend biz]...
1. #MissionMangal ₹ 97.56 cr [Thu-Sun]
2. #2Point0 [#Hindi] ₹ 95 cr [Thu-Sun]
3. #Kesari ₹ 78.07 cr [Thu-Sun]
India biz.— taran adarsh (@taran_adarsh) August 19, 2019
जॉन अब्राहमचा हा चित्रपटा एका सत्यघटनेवर आधारित आहे. ११ वर्षांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये एन्काऊंटरची घटना घडली होती. १९ सप्टेंबर २००८ मध्ये जामिया नगरच्या बाटला हाऊसमध्ये आतिफ अमीन आणि मोहम्मद साजित हे दोन संशयित दहशतवादी ठार झाले होते.
या चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसतेय. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रोमियो, अकबर, वॉल्टर' या चित्रपटात जॉन अब्राहमनं एका 'रॉ' एजन्टची भूमिका निभावली होती.