पुलवामा हल्ल्याविषयी 'उरी...'फेम विकी कौशल म्हणाला....

हल्ल्याची परतफेड करण्याची मागणी

Updated: Feb 17, 2019, 09:42 AM IST
पुलवामा हल्ल्याविषयी 'उरी...'फेम विकी कौशल म्हणाला....  title=

मुंबई : Pulwama Attack सीआरपीएफ जवान जात असणाऱ्या बसच्या ताफ्यावर गुरुवारी आत्मघाती हल्ला करण्यात आला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून घडवण्यात आलेल्या या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. ज्यामुळे संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनीच या हल्ल्याचा निषेध करत सरकारकडे हल्ल्याची परतफेड करण्याची मागणी केली. यातच आता 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता विकी कौशल याचाही समावेश झाला आहे. 

कोणीतरी आपलं गमावल्याचं दु:ख होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. एएनएय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने ही प्रतिक्रिया दिली. आता या हल्ल्याला आणि दहशतवादाला चोख उत्तर दिलं गेलंच पाहिजे, असं म्हणत एक राष्ट्र म्हणून आपण एकजुटीने परिस्थितीला सामोरं जाण्याची गरज असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या आता शहीदांच्या कुटुंबीयांना आपण आधार देण्याची गरज असल्याचं म्हणत विकीने शहीदांना श्रद्धांजली दिली. फक्त विकीच नव्हे, तर 'उरी..'मध्ये आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता मोहित रैना यानेही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला होता. पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचंही त्याने समर्थन केलं होतं. एकंदरच सर्व क्षेत्रांमद्ध्ये या हल्ल्य़ाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. 

पुलवामा हल्ल्याच्या जवळपास महिनाभरापूर्वीच 'उरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता झालेल्या हल्ल्यामुळे आता पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार का, असा प्रश्नही अनेक स्तरांतून उपस्थित करण्यात येत आहे. उरीमध्ये असणाऱ्या सैन्यदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचं उत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. शत्रूच्या घरात घुसून त्यांना अद्दल घडवणाऱ्या भारतीय सैन्याच्या या कारवाईवर आधारित चित्रपट साकारण्यात आला. 'उरी..'.मुळे सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी पुन्हा समोर आल्या आणि विकी कौशल या अभिनेत्याच्या कारकिर्दीला एक कलाटणी मिळाली. मुख्य म्हणजे सैन्यदलाविषयी प्रत्येक देशवासियाच्या मनात असणारा आदर कैक पटींनी वाढला.