मुंबई : बॉलिवूड गायक आणि संगीतकार अनु मलिक यांना #Metoo अंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपांतून दिलासा मिळाला आहे. अनु मलिकविरुद्ध अतिरिक्त पुरावा नसल्यामुळे त्यांच्यावरील केस सध्या बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे (national commission for women) याबाबत केस सुरु होती. मात्र पुराव्याअभावी हे प्रकरण तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अनु मलिक यांची केस बंद करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं सांगण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, अनु मलिकविरोधात महिलांकडून कोणतेही पुरावे समोर आल्यास ही केस पुन्हा सुरु होऊ शकते, अशी माहिती अध्यक्ष रेखा शर्मा यांनी दिली.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषणाविरोधातील #MeToo मोहिम सुरु झाली. नाना पाटेकर यांच्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांवरही लैंगिक शोषण आणि छळाचे आरोप लावल्याची अनेक प्रकरणे समोर आली. यात अनेक बड्या कलाकारांची नावंही समोर होती. या प्रकरणानंतर अनु मलिक यांच्यावरही गंभीर आरोप लावण्यात आले. या आरोपांदरम्यान अनु मलिक यांना रिऍलिटी शो इंडियन आयडॉल सीजन १० मधून बाहेर करण्यात आलं होतं. पण पुन्हा त्यांची इंडियन आयडॉल सीजन ११ मध्ये एन्ट्री झाली. परंतु शोच्या ११व्या सीजनमध्ये आल्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. त्यानंतर अनु मलिक यांनी स्वत: शोमधून काढता पाय घेतला.
अनू मलिक कलाविश्वातील संगीत क्षेत्रातील मोठं नाव आहे. अनु मलिक यांच्यावर लावण्यात आलेल्या मीटू आरोपांनंतर संपूर्ण कलाविश्वात मोठी खळबळ उडाली होती. अनू मलिक यांच्यावर महिलांनी लैंगिक छळाचे आरोप लावले आहेत. श्वेता पंडित आणि सोना मोहापात्रानेही त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. परंतु या सर्व आरोपांचं अनू मलिक यांनी खंडण केलं आहे.