मुंबई : इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया,अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने 'आता वेळ झाली' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून इच्छामरणावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी नाना पाटेकर, डॅा मोहन आगाशे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर आणि डॅा. मोहन आगाशे यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. सोबतच असे चित्रपट वरचेवर यावेत, तसेच प्रेक्षकांनीही ते पाहावेत, असे आवाहनही केले.
दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणतात, " इच्छामरणावर प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत. हा विषय सामाजिक, भावनिक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया, मते या अगदीच मिश्र असणार, हे मला ठाऊक होते. मात्र प्रेक्षकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून मला प्रचंड आनंद होतोय."
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शि, लिखित 'आता वेळ झाली' हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते असून दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इच्छामरण या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
याचबरोबर या सिनेमाला प्रेक्षकांसह बॉलिवूडकरांनीही आपली मते व्यक्त केली आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'ड्रिमगर्ल' हेमामालिनी यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दलचे महत्व अधोरेखित करत अनंत महादेवन, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर नाना पाटेकर, सुचित्रा पिल्लई, दिग्दर्शक अब्बास मुस्तान, सुहासिनी मुळ्ये, आदिल हुसेन, तनिष्ठा चॅटर्जी यांनीही चित्रपटाला शुभेच्छा देत, चित्रपट पाहाण्याचे आवाहन केले आहे. तर इतरही अनेक कलाकारांनी या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळेच इच्छामरण असावे की नसावे, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरु आहेत. या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल, या आशेवर जगणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणे विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा शेवट आनंदी हवा असेल तर तुम्हाला तुमची कथा कुठे संपवायची, हे माहित असणे आवश्यक आहे, आयुष्यात हे सूत्र जपणाऱ्या एका वयस्क जोडप्याच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणाऱ्या 'आता वेळ झाली' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पासष्टी पार केलेल्या शशिधर लेले आणि रंजना लेले यांची इच्छामरणाची परवानगी मिळवण्यासाठीची धडपड यात दिसत आहे.