मुंबई : कलाविश्वातील बरीच कलाकार मंडळी अनेकदा देशात सुरु असणाऱ्या किंवा इतरत्रही सुरु असणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे त्यांची मतं मांडतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव असणाऱ्या एका सेलिब्रिटीनं सध्या थेट केंद्र सरकारलाच प्रश्न विचारत अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.
कोरोना coronavirus प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात आता टाळी-थाळी वाजवून झाली, घंटानादही झाला. तेव्हा कोरोनाला थांबवण्यासाठी आता डीजे लावायचा का? असा खोचक उपरोधिक प्रश्न संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानी यानं विचारला.
विशालचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही विनोदांचा आधार घेत थेट केंद्रालाच निशाण्यावर घेतलं. 'शेठ, देशात ५०० कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या. आता ८ लाख झालेत, DJ वाजवून बघूया का', असा टोला लगावणारं ट्विट त्यानं केलं. देशात दिवसागणिक वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा हे आता एक मोठं आव्हान ठरत आहे. शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब करुनही देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात न येणं यात नेमकं काय चुकलं, अशा अनेक प्रश्नांची उकल करुन घेण्यासाठी म्हणून विशालनं हा मार्ग अवलंबला.
शेठ
देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्याआता 8 लाख झालेत
DJ वाजवून बघूया का...
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) July 13, 2020
लॉकडाऊनदरम्यान, काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वॉरिअर्सना शाबासकीची थाप देण्यासाठी म्हणून देशवासियांना घंटा, टाळ्या आणि थाळ्यांचा नाद करण्याचं आवाहन केलं होतं. अनेकांनी याचा संबंध थेट कोरोनाशी जोडत ध्वनीतून निर्माण होणाऱ्या लहरींमुळं कोरोनाचा नायनाट होतो असा अजब तर्कही लावला, ज्यामुळं हे टाळी- थाळीनाद प्रकरण विशेष गाजलं होतं.