प्रदर्शनापूर्वीच 'द ताश्कंद फाईल्स' वादाच्या भोवऱ्यात

दिग्दर्शकाला कळेना यामागचं नेमकं कारण 

Updated: Apr 10, 2019, 08:16 PM IST
प्रदर्शनापूर्वीच 'द ताश्कंद फाईल्स' वादाच्या भोवऱ्यात title=

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी निधनावर भाष्य करणाऱ्या आणि गतकाळातील काही घटनांविषयी पुन्हा विचार करायला भाग पाहणाऱ्या 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटाच्या वाटेत काही अडथळे आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटासंबंधीची एका कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. 

शास्त्रींच्या नातवंडांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केल्याची माहिती विवेक यांनी दिली. १९६६ मध्ये झालेला ताश्कंद करार आणि त्यानंतर लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनाच्या घटनेवर या चित्रपटाचं कथानक भाष्य करतं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या कथानकाविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण, आता मात्र तो अडचणींच्या भोवऱ्यात सापडल्याचं कळत आहे. 

'आयएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार विवेक यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. ज्यामध्ये शास्त्रींच्या नातवंडांना कोणीतरी भडकावल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं. 'काल (मंगळवारी) रात्री आम्हाला एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लाल बहादुर शास्त्री यांच्या नातवाने चित्रपट आवडल्याचं सांगत त्याची प्रशंसाही केली होती', असं विवेक यांनी स्पष्ट केलं. 

काँग्रेस पक्षश्रेष्टींपैकीच कुटुंबातील कोणा एका व्यक्तीने त्यांना ही कायदेशीर नोटील पाठवण्यास प्रवृत्त केलं असावं, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. सोबतच या चित्रपटाच्या वाटेत अडथळे का निर्माण केले जात आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तेव्हा आता ऐन निवडणुकांच्या वातावरणाचा 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटाला काही फायदा होतो, की त्याच्या वाटेतील अडचणींचा डोंगर मोठा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.