'दिल ही तो है'मध्ये पाहा 'देसी गर्ल'सोबत फरहानची अफलातून केमिस्ट्री

रुपेरी पडद्यावर काही जोड्या या प्रेक्षकांच्या मनाचा विशेष ठाव घेतात

Updated: Sep 22, 2019, 08:21 AM IST
'दिल ही तो है'मध्ये पाहा 'देसी गर्ल'सोबत फरहानची अफलातून केमिस्ट्री   title=

मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. देसी गर्ल म्हणजे प्रियांका चोप्रा आणि फरहानवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं पाहताना जितकं रंजक वाटतं तितकंच ते श्रवणीयसुद्धा आहे. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारं सुरेख नातं, त्या नात्यात असणारे अनेक भाव या गाण्याच्या निमित्ताने पाहायला मिळतात. 

प्रेमापासून लग्नापर्यंतचा प्रवास या गाण्यातून पाहायला मिळतो. सोबतच पाहायला मिळते ती म्हणजे प्रियांकासोबतची फरहानची अफलातून केमिस्ट्री. रुपेरी पडद्यावर काही जोड्या या प्रेक्षकांच्या मनाचा विशेष ठाव घेतात. त्यापैकीच एक म्हणजे फरहान आणि प्रियांका असं म्हणाला हरकत नाही. तेव्हा त्यांनी या चित्रपटात साकारलेल्या अदिती चौधरी आणि निरेन चौधरी या भूमिकांना कशी दाद मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अरिजित सिंग आणि अंतरा मित्रा यांनी गायलेल्या या गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केलं आहे. तर, या गाण्याचे गीतकार आहेत, गुलजार. शोनाली बोस दिग्दर्शित  'द स्काय इज पिंक' या चित्रपटातून एक सुरेख अशी प्रेमकहाणी आणि असं वास्तव मांडण्यात येत आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्याशी काही ना काही प्रमाणात जोडलेलं असेल. असा हा बहुचर्चित चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये चित्रपट विश्वातून काढता पाय घेणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिम हिचीही झलक पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकारांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसाही केली आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत हा चित्रपट किती उंची गाठतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.