Movie Review : भावनिक रंगांची सुरेख उधळण म्हणजे 'द स्काय इज पिंक'

 

Updated: Oct 11, 2019, 10:59 AM IST
Movie Review : भावनिक रंगांची सुरेख उधळण म्हणजे 'द स्काय इज पिंक' title=

मुंबई : 

दिग्दर्शन- शोनाली बोस 

कलाकार- प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम, रोहित सराफ

निर्मिती- प्रियांका चोप्रा, रोनी स्क्र्यूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर 

संगीत- प्रितम (गीते); मिकी मॅक्लरी (पार्श्वसंगीत)

'द स्काय इज पिंक...' मोठ्या अलंकारिक अंदाजात चित्रपटाचं नाव प्रसिद्ध करत जेव्हा याच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हापासूनच प्रेक्षकांना हे प्रकरण नेमकं आहे तरी काय याविषयी उत्सुकता पाहायला मिळाली. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर ही नवखी जोडी आणि तितकेच तगडे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. ही अनेकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच. 

मुळात 'द स्काय इज पिंक'च्या प्रसिद्धीची कैक कारणं आहेत हे खरं. पण, यापलीकडेही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात घेण्यात आलेल्या मेहनतीचा अंदाज येतो आणि कलाकारांचं कौतुक करावंसं वाटतं. या चित्रपटाच्या बाबतीत असंच घडत आहे. जेथे दिग्दर्शकापासून निर्माते आणि प्रत्येक लहानमोठ्या कलाकाराची दाद द्यावी तितकी कमीच वाटत आहे. 

शोनाली बोस दिग्दर्शत हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. अदिती (प्रियांका चोप्रा) आणि नीरेन (फरहान अख्तर) यांची ही कथा. अदिती आणि नीरेन यांच्यातच शारीरिकदृष्ट्या अशा काही बाबी असतात ज्यांमुळे त्यांच्या मुलांना जन्मत:च काही आजार उदभवतात. किंबहुना ते आपल्या पहिल्या अपत्याला गमावूनही बसतात. पुढे आएशा (झायरा)चा जन्म होतो. तिलाही जन्मत:च एक आजार असतो. मुलीचं हे आजरपण, पुन्हा एकदा नीरेन आणि अदितीला भेडसावून जातं. याचदरम्यान त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणजेच मुलगा इशान सर्वांचं लक्ष वेधतो. इशानची प्रकृती तुलनेने चांगली असते. पण, आएशा मात्र वेळोवेळी जन्म-मृत्यूशी लढत असते. मुळात आपला अंत कसा आहे हे आएशा जाणत असते. तरीही तिला वाचवण्यासाठी, काही आनंदाच्या क्षणांची उधळण तिच्यावर करण्यासाठी नीरेन आणि अदिती फार धडपडत असतात. 

चित्रपटाच्या कथानकात येणारं प्रत्येक वळण हे भावनांचं असंकाही चित्रण करुन जातं की अनेकदा डोळे ओलावतात. कथानक अशाच वेगाने पुढे जातं. पूर्वार्धानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो आणि तो लांबतोय की काय असं वाटू लागतं. पण, इथे साथ मिळते ती म्हणजे प्रासंगिक विनोद आणि हलक्याफुलक्या संवादांची. या साऱ्यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाला दाद देणं महत्त्वाचं आहे.  

'द स्काय इज पिंक'ची मुख्य सूत्रधार आहे, अभिनेत्री झायरा वसिम. कथा तिच उलगडत जाते. पण, तिचा कथा उलगडण्याचा अंदाज पाहता पुन्हा एकदा शोनलीचं दिग्दर्शन मन जिंकून जातं.  

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा जवळपास तीन वर्षांनंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये झळकली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही तिने सांभाळली आहे. मुख्य म्हणजे प्रियांकाने चित्रपट निर्मितीसोबतच अभिनेत्री म्हणूनही फार उत्तम जबाबदारी निभावली आहे. तिने साकारलेली अदिती पाहताना नकळतच मनाचा एक कोपरा अदितीचा स्वीकार करुन जातो. फरहाननेही तिला सुरेख जोड दिली आहे. यातच झायरा वसिम आणि रोहित सराफ यांनीही प्रियांका आणि फरहानच्या अभिनयाला चांगली साथ दिली आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि गीतं प्रत्येक दृश्याला अनुसरुनच आहेत. त्यामुळे कथानकाला एका दिशेने नेण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. एकंदरच काय, तर 'द स्काय इज पिंक...' खऱ्या अर्थाने एका वेगळ्या रंगाची उधळण करत आहे. तेव्हा या रंगांची उधळण एकदा पाहाच....