मुंबई : विविध धाटणीच्या चित्रपटांना हाताळणाऱ्या या कलाविश्वात अभिनेता अक्षय कुमार इतिहासाच्या पानांमध्ये बरंच मागे गेलेल्या एका युद्धाची आठवण प्रेक्षकांना करुन देण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकांमध्ये झळकणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे 'केसरी'. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. खुद्द खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार यात एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून, अद्वितीय साहसाची झलक आणि प्रचंड देशप्रेमाचीच अनुभूती त्याच्याकडे पाहून होत आहे.
२१ भारतीय, शीख सैनिकांची शौर्यगाथा या ट्रेलरमधून भेटीला येथे. जवळपास शत्रू पक्षातील १० हजार सैनिकांशी त्यांनी लढा दिला तरी कसा याचीच झलक या तीन मिनिटांच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. परिणीती चोप्राचा लूक आणि अक्षयने साकारलेला शीख सैनिक पाहताना अंगावर काटा येतो. निव्वळ अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांची ही गाथा २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या काळात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून साहसाची नवी परिभाषाही उलगडली जाणार आहे. शीखांचं सैन्यदल आणि देशप्रेम हे शब्दांत मांडता येणं निव्वळ अशक्यच. पण, तरीही त्याचा खराखुरा भाव टीपत दिग्दर्शकाने 'केसरी' साकारला असल्याचं हा ट्रेलर पाता लक्षात येत आहे. डोक्यावरच्या पगडीपासून शरीरातील रक्ताच्या थेंबापर्यंत सर्वकाही केसरी असल्याचं मोठ्या गर्वाने सांगणाऱ्या या वीर जवानांची गाथा बॉक्स ऑफिसलाही याच रंगात रंगवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.