Kedarnath Movie Review : नि:स्वार्थ प्रेम, श्रद्धेची अनुभूती देणारा 'केदारनाथ'

शायद फिर इस जनम मे मुलाकात हो ना हो....  

Updated: Dec 7, 2018, 08:14 AM IST
Kedarnath Movie Review : नि:स्वार्थ प्रेम, श्रद्धेची अनुभूती देणारा 'केदारनाथ' title=

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 

दिग्दर्शक : अभिषेक कपूर
निर्माते : रोनी स्क्रूवाला, अभिषेक कपूर
मुख्य भूमिका : सारा अली खान, सुशांत सिंह राजपूत 
संगीत दिग्दर्शन : गीते- अमित त्रिवेदी
पार्श्वसंगीत : हितेश सोनीक

'केदारनाथ'..... असा उल्लेख जरी केला तरीही भक्तीच्या भावनेसोबतच मनात आणखी एक भावना घर करुन जाते. काहीशी धडकी भरवणारी, विचारांचा काहूर माजवणारी, तरीही निराशा न करणारी. अशाच या भावनांची सांगड घालत दिग्दर्शक अभिषेक कपूरने बॉलिवूडपट साकारण्याचा निर्णय घेतला आणि त्या अदृश्य शक्तीच्याच आशीर्वादाने त्याने हे आव्हान पेललं. त्याला साथ मिळाली ती म्हणजे कलाकारांची, निसर्गाच्या विविध रुपांची आणि अर्थातच केदारनाथाची.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिग्दर्शकाच्या नजरेतून फिरणारा कॅमेरा प्रेक्षकांना थेट केदारनाथ देवस्थानाचं दर्शन घडवतो. 'नमो नमो जी शंकरा....', असं म्हणत सुरुवात होते एका यात्रेची, श्रद्धेची, प्रेमाच्या प्रवासाची. सारा अली खान (मुक्कू), सुशांत सिंह राजपूत (मन्सूर), नितीश भारद्वाज (पंडीतजी) आणि इतर कलाकार, खरंतर इतर यात्रेकरुच म्हणावं, ज्यांनी ही यात्रा, अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आणली आहे. कारण प्रत्येक कलाकाराने त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत अक्षरश: स्वत:ला झोकून दिल्याचं कळत आहे. त्यामुळे कलाकारांच्या प्रयत्नांची, अभिनयाची दाद द्यावी तितकी कमीच.

अतिशय संवेदनशील मुद्दा मांडताना सारा अली खान हा नवा चेहरा, ही नवी अभिनेत्री या चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येते. साराने साकारलेली 'मुक्कू' पाहता तिच्या प्रत्येक कृतीशी अनेकजणी स्वत:ला जोडू पाहतील. तर, सुशांतही तिला चांगलीच साथ देत आहे. त्याच्या अभिनयाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने टीपलेले बारकावेही लगेचच लक्षात येतात. मग ते एखादा पीठ्ठू कसा चालतो, इथपासून आपल्याच परिसरात वावरताना तो कशा प्रकारे स्वैर असतो याची झलक त्याच्या अभिनयातून पाहायला मिळते. डोंगर, पर्वत आणि केदारनाथशी त्याची नाळ जोडली गेली आहे, त्यामुळे धर्म वेगळा असूनही त्याचे नि:स्वार्थ भावच खऱ्या अर्थाने त्याला सर्वांपासून वेगळं पण, तितकच प्रभावी ठरवतात.

सारा आणि सुशांत म्हणजेच 'मुक्कू' आणि 'मन्सूर' यांचं नातं फुलतं, वादळांचा सामना करतं, समाजाचा विरोध पत्करतं आणि प्रलयाचा माराही झेलतं करतं. त्यांच्या या नात्याला चित्रपटात अवघ्या काही मिनिटांसाठी का असेना पण, अधोरेखित करतं ते म्हणजे लतादीदींनी गायलेलं वो कौन थी या चित्रपटातील गाणं, 'लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो.....' हे गाणं वाजताच नकळतच त्याची जादू होते. मध्येच कथानक काहीसं संथपणे पुढे जातंय असं वाटलं तरीही चित्रपट फारसा मोठा  नसल्यामुळे हा संथपणाही हवाहवासा वाटतो. चित्रपटात काही गोष्टी वगळल्या तर तो  नि:स्वार्थ प्रेम आणि श्रद्धेची अनुभूती देतोय. 

निसर्गावर घाला घालत फक्त आणि फक्त स्वार्थासाठीच डोंगररांगा म्हणू नका किंवा मग नदीचा प्रवाह, प्रत्येक ठिकणी अतिक्रमण करणाऱ्या मानवी कृतींना कुठेतरी आळा घालण्यासाठी मग निसर्ग आणि नाही म्हणायला ती अदृश्य शक्तीसुद्धा जणू कसोशीचे प्रयत्न करते आणि अतिरेकाच्या उत्तरात मिळतो तो म्हणजे 'महाप्रलय'. कोणत्याही गोष्टीच्या मर्यादा या ओळखल्या गेल्याच पाहिजेत, हा संदेशही या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना मिळतो.

निसर्गावर घाला घालण्यासाठी जेव्हा जेव्हा मानवाने एक पाऊल उचललं आहे तेव्हा प्रत्येक वेळी निसर्गाने गनिमी कावा करत त्याचा डाव साधला आहे. केदारनाथच्या महाप्रलयातही असंच काहीसं झालं. 'मुक्कू' आणि 'मन्सूर'च्या प्रेमात या प्रलयाचा आणि केदारनाथचा वाटा महत्त्वाचा आहे हे खरं. पण, त्यासोबतच त्यांच्यासोबत वावरणारं प्रत्येक पात्रही तितकच महत्त्वाचं आहे.

नात्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अनपेक्षित वळणाला तोंड देण्याची 'मुक्कू'ची वृत्ती पाहता सैफची लेक हीच का ती.... असं म्हणत प्रेक्षकही नकळत तिच्या (साराच्या) अभिनयाची दाद देऊन जातात. चित्रपटात साकारण्यात आलेली महाप्रलयाची दृश्य पाहता अंगावर  काटा उभा राहतो. पण, पुन्हा केदारनाथच्याच नावाचा प्रत्येक वेळी धावा केल्यामुळे त्याचं अस्तित्वच जणू संपूर्ण पटकथेमध्ये सामावल्याचं जाणवतं.

अमित त्रिवेदीने चित्रपटाला संगीत दिलं असून, अमिताभ भट्टाचार्यने त्यात लिहिलेली प्रासंगिक गीतं ही कथानक पुढे न्यायला मदत करतात. तर, कलाकारांचे लूक आणि त्यांच्या एकंदर वावराविषयी म्हणावं तर, त्यात साधेपणा आणि सहजता जाणवते. साराकडे पाहताना वारंवार तिच्या अभिनयातून अभिनेत्री अमृता सिंग ही तिची आईच झळकत असल्याचा भास होतो. चेहरेपट्टीपासून ते अगदी तिच्या संवाद कौशल्यापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये अमृता सिंगचीच छाप दिसून येते. 'केदारनाथ'मध्ये साराने स्वत:ला सिद्ध केलं आहेच. पण, सोबतच सुशांत सिंह राजपूतने पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. त्यामुळे केदारनाथचं सृष्टीसौंदर्य, कलाकारांचा अभिनय, निस्वार्थ प्रेम आणि श्रद्धेच्या एका प्रवासावर जाण्याची इच्छा असेल तर 'केदारनाथ' नक्की पाहा. 

- सायली पाटील
SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com