Kalank teaser VIDEO : 'कलंक' नही, इश्क है...

 समोर येतात ते विविध आणि तितक्याच लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकणारे कलाकार

Updated: Mar 12, 2019, 02:25 PM IST
Kalank teaser VIDEO : 'कलंक' नही, इश्क है...  title=

मुंबई : एक स्वप्नवत प्रोजेक्ट असल्याचं करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच का म्हणत होता हे आता नेमकं स्पष्ट होत आहे. 'कलंक' या करणसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पहिल्या दृश्यापारसून ते अखेरच्या दृश्यापर्यंत प्रत्येक वेळी कलंकला करणने इतकं महत्त्वं का दिलं आहे याची अनुभूती येत आहे. 

'कुछ रिश्ते कर्जों की तरह होते है, उन्हे निभाना नही चुकाना पडता है...' अशा संवादाने 'कलंक'ची ओळख होते. टीझर जसजसा पुढे जातो तसतशी कथानकाही झलक दाखवणाऱ्या या घडीचे एक एक पदर खुलत जातात. समोर येतात ते विविध आणि तितक्याच लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकणारे कलाकार. वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित अशा कलाकारांची झलक या टीझरमधून पाहायला मिळते. एक अनोखा काळ प्रेक्षकांच्या नजरेसमोर उभा राहतो. त्याला साथ मिळताना दिसते ती म्हणजे मोठे सेट आणि तितक्याच प्रभावी पार्श्वसंगीताची. 

१९४५ च्या काळातील एक अदभूत प्रेमकहाणी म्हणजे कलंक, हे फार आधीपासूनच सांगण्यात आलं होतं. पण, अदभूत या शब्दामागील कल्पना टीझर पाहताना लक्षात येत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी कलंकची संकल्पना विचारात आली होती. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे, असं म्हणत करण जोहरने त्याच्या या चित्रपटाची ओळख सर्वांनाच करुन दिली आहे. त्यामुळे आता प्रदर्शनानंतर कलंकची जादू कायम राहते का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज, धर्मा प्रोडक्शन, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असणारा हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.