मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याची सर्वदूर चर्चा होत असते. कलाविश्वापासून ते अगदी चाहत्यांच्या वर्तुळापर्यंत सर्वत्रच या 'मोस्ट हॅपनिंग कपल'ची चर्चा सुरु असते. अशी ही जोडी सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ पाहताना, रणबीरविषयी बोलताच एक प्रेयसी म्हणून आलिया नेमकी कशी लाजली हे पाहायला मिळत आहे. गेल्या वीस वर्षांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराची घोषणा करण्यासाठी आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी म्हणून रेखा व्यासपीठावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी रणबीरला हा पुरस्कार देण्यापूर्वी त्याचं कौतुक केलं.
एक व्यक्ती, सहकारी, अभिनेता, मुलगा म्हणून रणबीर अतिशय चांगला आणि तितकाच जबाबदार असल्याचं त्या म्हणाल्या. ज्यानंतर त्यांनी या पुरस्काराची घोषणा केली. काही कारणास्तव रणबीर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावू शकला नव्हता. पण, त्याला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद रेखा यांना झाला होताच. सोबतच, आणखी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहायला मिळाला. ती व्यक्ती म्हणजे रणबीरची प्रेयसी, अभिनेत्री आलिया भट्ट.
रेखा व्यासपीठावर असतेवेळीत पुरस्कार सोहळ्याच्या सुत्रसंचालकांनी त्यांना आलिया भट्टच्या 'गली बॉय' या चित्रपटातील, 'मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलूगुलू करेगी तो धोपटूंगी.....' हा डायलॉग म्हणण्यास सांगितलं. तेव्हाच हा डायलॉग स्क्रीप्ट लिहिणाऱ्यांनी नव्हे, तर खुद्द आलियाच्या अंतर्मनानेच लिहिल्याचं म्हणत रेखा यांनी तिची मस्करी केली.
'गली बॉय'मधील हा डायलॉग म्हणतेवेळी पुढे रेखा यांनी आलियाला व्यासपीठावर बोलवलं. ज्यानंतर आलिया येताच त्यांनी पुन्हा रणबीरची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, रेखा यांनी रणबीर एक चांगला प्रेमी असल्याचंही म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर आलिया अशी काही लाजली की पुरस्कारसोहळ्यासाठी उपस्थित प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्मित उमटलं.
सोशल मीडियावरही व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून, चाहत्यांनी या सेलिब्रिटी जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत असणारे रणबीर आणि आलिया येत्या काळात अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहेत. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या जोडीची रुपेरी पडद्यावरील अदाकारी प्रेक्षकांना भावते का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.