मुंबई : बुधवारी अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) यानं त्याच्या आईचं निधन झाल्याचं सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं ही दु:खद बातमी सर्वांपर्यंत पोहोचवली. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, असं सांगत आई माझ्यासाठी सर्वकाही होती या शब्दांत त्यानं भावनांना वाट मोकळी करुन दिली.
आईचे अंत्यविधी उरकून अक्षय मनात सर्व भावना एकवटत घराकडे परतला. पण, यानंतरही आपल्या दु:खाला मनाच्या एका कोपऱ्यात दाबत दुसऱ्या एका सेलिब्रिटीला आधार द्यायला पोहोचला.
सिनेदिग्दर्शक आनंद एल. राय, यांच्या आईनंही बुधवारी अखेरचा श्वास घेतला. ज्यानंतर त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. राय यांच्यावरही इतका मोठा दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच खिलाडी कुमार त्यांना आधार देण्यासाठी तिथं पोहोचला. यावेळीही त्याच्या चेहऱ्यावर असणारी एक विचित्र भावना स्पष्टपणे दिसत होती.
आपल्या जीवनाचा मोठा भागच कुठेतरी राहून गेल्याची खंत त्या चेहऱ्यावर दिसत होती. अक्षय कुमार आणि आनंद एल. राय हे दोघंही 'रक्षाबंधन' या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरही झळकणार आहे. 'अतरंगी रे' या चित्रपटासाठीही त्यांनी एकत्र काम केलं, पण कोविड संकटामुळं हा चित्रपट लांबणीवर पडला आहे.