मुंबई : महेश भट्ट यांच्या 'जलेबी' आणि कृती खरबंदा हिच्या 'वीरे दी वेडिंग', या चित्रपटांचा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून नावारुपास आलेल्या क्रिश कपूर याने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. क्रिशच्या कुटुंबीयांनीच याविषीयीची माहिती दिली.
सुरुवातीला क्रिशचा अपघाती मृत्यू झाल्याची बरीच चर्चा झाली होती. पण, अखेर ब्रेन हॅमरेजमुळं त्याचं निधन झाल्याची माहिती समोर आली. क्रिशचे मामा सुनील भल्ला यांनी अपघाती मृत्यूच्या अफलवा धुडकावून लावत खरी माहिती समोर आणली. मुंबईतील मीरारोड येथे असणाऱ्या आपल्या घरीच क्रिश ब्रेम हॅमरेजमुळे बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं सांगितलं.
पीटीआयशी संवाद साधताना ते म्हणाले, 'त्याला कोणताही आजार नव्हता. त्याची प्रकृती अगदी उत्तम होती. ३१ मे रोजी तो त्याच्या राहत्या घरी पडला, ज्यानंतर त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाला. ब्रेन हॅमरेज सुरु झाल्यामुळंच त्याचा मृत्यू झाला.'
क्रिशच्या मृत्यूची माहिती ही अनेकांनाच धक्का देऊन गेली. कित्येकांचा तर यावर विश्वासही बसला नाही. आतापर्यंतच्या कारकिर्दीत क्रिश महेश भट्ट आणि विशेष भट्ट यांच्या 'विशेष फिल्म्स'शी जोडला गेला होता.