बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने (Triptii Dimri) बुलबुल, काला, लैला मजनू या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. पण तृप्ती डिमरीला रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील तिच्या छोट्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली आणि रातोरात ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती राजकुमार राव याच्यासह प्रमुख भूमिका असणाऱ्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तृप्ती डिमरीची अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिने या क्षेत्रात येण्याचा विचारच केला नव्हता.
The Hollywood Reporter India शी साधलेल्या संवादात तृप्ती डिमरीने सांगितलं की, “मला फक्त काहीतरी वेगळं करायचे होते. मी शैक्षणिकदृष्ट्या फार काही चांगली नव्हती. मी माझ्या पालकांना सांगितलं की मी हे (मॉडेलिंग) करून पाहणार आहे”.
"माझे आई-वडील माझ्या मुंबईला जाण्याच्या निर्णयामुळे खूप घाबरले होते, कारण मी एक लाजाळू, अंतर्मुख मुलगी होती जी कधीही दिल्लीतून बाहेर पडली नव्हती. मॉडेलिंग किंवा शोबिझमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या निर्णयावरही ते खूश नव्हते. त्यांचा आक्षेप असतानाही मी निवड केली आणि मॉडेलिंगमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला कारण तिला नंतर पश्चात्ताप करत बसायचं नव्हतं," असं तृप्तीने सांगितलं.
यानंतर तृप्तीने ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. तिला पोस्टर बॉईज (2017) चित्रपटात बॉबी देओल, श्रेयस तळपदे आणि सनी देओल यांच्यासह संधी मिळाली. पण हा चित्रपट करताना आपल्याला अभिनयाची काहीच माहिती नव्हती असं तृप्ती सांगते. “मला DOP (director of photography) चा किंवा पीओव्ही (point-of-view) शॉट म्हणजे काय हे माहित नव्हते. . मी त्यात चांगला अभिनय करु शकली नाही कारण मला अभिनयाचा ‘अ’ माहित नव्हता,” असं ती म्हणाली.
साजिद अली दिग्दर्शित, 2018 च्या रोमान्स ड्रामा 'लैला मजनू' मधील लैलाच्या भूमिकेने तृप्ती डिमरीला ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे, सुरुवातीला या चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये तिला नाकारण्यात आलं होतं. परंतु तिच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळे तिला परत बोलावण्यात आलं होतं, जे काश्मिरी लोकांची आठवण करून देतात. शेवटी, तिने भूमिका मिळवली, पण ती पुढे चालू ठेवायची की नाही याबद्दल तिला अनिश्चिततेचा सामना करावा लागला.
"तेव्हाही मला अभिनय माहित नव्हता. मी माझे दिग्दर्शक साजिद अली आणि अविनाश तिवारी यांच्यासोबत वर्कशॉपमध्ये बसायचे, त्यांच्यात अभिनय, नेपथ्य आणि व्यक्तिरेखा यावर चर्चा व्हायची. मी फक्त तिथेच बसून राहायचे, काहीच कळत नसल्याने माझ्या चेहऱ्यावर काही भाव नसायचे. मी घरी जाऊन रडत असे. ‘मी बरोबर करत आहे का?’ असा विचार करत असे, कारण ते काय बोलत आहेत किंवा त्यांची भाषा मला समजत नव्हती,” असा खुलासा तृप्तीने केला. ती पुढे म्हणाली, “पण मी खूप घाबरले होते. जेव्हा तुम्ही तिथे असता आणि काहीही समजत नाही, तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही मूर्ख आहात. मला दररोज मूर्खासारखे वाटाय़चे.”
सुरुवातीला या क्षेत्राबद्दल जास्त माहिती नसतानाही, उत्तराखंडमधील गढवाल येथील 30 वर्षीय अभिनेत्रीने खूप मोठा पल्ला गाठला आहे. 2024 मध्ये, तृप्ती 'बॅड न्यूज'मध्ये दिसली होती आणि ती राजकुमार राव सोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'च्या रिलीजसाठी तयारी करत आहे. सध्या ती 'भूल भुलैया 3' आणि 'धडक 2' च्या शूटमध्ये व्यग्र आहे.