निवडणुकांसाठी प्रचार करणं अभिनेत्रीला पडलं महागात

स्पष्ट आणि ठाम वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते 

Updated: Oct 14, 2019, 05:44 PM IST
निवडणुकांसाठी प्रचार करणं अभिनेत्रीला पडलं महागात  title=

मुंबई : भारत हे लोकशाही राष्ट्र आहे, एक असं राष्ट्र जिथे निवडणुका म्हणजे जणू एक उत्सवच. अशाच वातावरणात निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होणं एका अभिनेत्रीला महागात पडलं आहे. खुद्द त्या अभिनेत्रीनेच या साऱ्यामुळे तिला नेमका काय अनुभव आला हे स्पष्ट केलं. 

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणारी ही अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. स्वराने काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान काही उमेदवारांसाठी प्रचार केला होता. पण, पे प्रचारतंत्र तिला मात्र महागात पडलं आहे हे खरं. कारण, उमेदवारांचा प्रचार केल्यामुळे काही प्रसिद्ध ब्रँड आणि मोठमोठ्या कार्यक्रमांना तिला मुकावं लागलं. 

आगामी चित्रपटाच्या पोस्टर लाँच कार्यक्रमावेळी सेलिब्रिटी आणि त्यांच्या राजकीय भूमिका, देशातील राजकारण याविषयी तिला एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत स्वराने स्वत:चाच अनुभव सर्वांसमोर ठेवला. ज्या दिवशी आपण लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार केला होता, त्याच दिवशी ४ ब्रँड आणि ३ मोठे कार्यक्रम मी गमावले होते, असं स्वराने सांगितलं. 

आपणच सर्वोत्तम किंवा महान आहोत अशातील भाग नाही हे स्वराने स्पष्ट करत एका सेलिब्रिटीला त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची शाश्वती नसते. मुळात या गोष्टींविषयी कोणतीही हमी नसते ही बाब अधोरेखित केली. 'जेवणाच्या वेळी झालेल्या चर्चांविषयी कोणा मोठ्या सेलिब्रिटीने काही वक्तव्य केलं तर त्यांना टीकेचा सामना करावा लागतो. एखाद्या मुद्द्यावर ठाम मत मांडलं तर त्याच्यावर दगडफेक होते. तर मग सेलिब्रिटींनी त्यांचं आयुष्य, त्यांचं कुटुंब धोक्यात का टाकावं हा प्रश्न मुळात आपण स्वत:लाच विचारला पाहिजे', असं ती म्हणाली. 

लोकसभा निवडणुकांच्या वेळी स्वराने बेगुसराय येथे कन्हैय्या कुमर, आप उमेदवार अतीशी मरलेना, राघव चड्ढा आणि अम्रा राम यांच्यासाठी प्रचार केला होता. सोशल मीडियावरही तिच्या या प्रचारसोहळ्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. ज्याचे थेट परिणाम साऱ्याच्या कामावरही झाले असं म्हणायला हरकत नाही.