मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी आणि तिची मुलगी निशा कौर वेबर या दोघींची मायलेकीची जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीची. निशाला काही नव्या गोष्टी शिकवण्यापासून ते अगदी तिच्यावर संस्कार करेपर्यंतची प्रत्येक जबाबदारी सनी सुपरेखपणे पार पाडताना पाहून अनेकांनाच तिचं कौतुक वाटतं. अशा या अभिनेत्रीच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच निशाचा पाचवा वाढदिवस नुकताच पार पडला. त्याच निमित्तानं सनीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये निशाचा गोड आवाज काळजाचा ठाव घेत आहे.
जगभरातील लहान मुलांनी एकत्र येत वाईटाविरोधात उभं राहूया असं birthday wish तिनं मागितल्याचं या पोस्टमध्ये ऐकू येत आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहित या लहानग्या परीकडून आपण कायमच प्रेरणा घेत राहू असं सनीनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. निशा पाच वर्षांची होत असल्यावर आपला विश्वासच बसत नसल्याचं म्हणत सनीनं अतिशय भावनिक असं कॅप्शन तिच्यासाठी लिहिलं. तिच्या या पोस्टनंतर कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच निशाला शुभेच्छा देत आशीर्वादही दिल्याचं पाहायला मिळालं.
सनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी २०१७ मध्ये निशाला दत्तक घेतलं होतं. तेव्हापासूनच पालकत्वाचा त्यांचा प्रवास सुरु झाला. एखादा कार्यक्रम असो, सोशल मीडिया असो किंवा मग दैनंदिन आयुष्य. सनी कायमच तिच्या मुलांना प्राधान्य देताना दिसते.