Tanishq row : मराठमोळ्या अभिनेत्रीनं स्वत:चं उदाहरण देत वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनेता मो. झिशान आयुब याच्याशी ती विवाहबंधनात अडकली होती   

Updated: Oct 15, 2020, 08:57 AM IST
Tanishq row : मराठमोळ्या अभिनेत्रीनं स्वत:चं उदाहरण देत वेधलं सर्वांचं लक्ष  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : मागील काही दिवसांपासून Tanishq row 'तनिष्क'च्या जाहिरातीसंदर्भातील बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. राजकीय नेतेमंडळींपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सर्वजणांनी या वादात उडी घेतली आहे. मुख्य म्हणजे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर ही मंडळी आपली मतं मांडताना दिसत आहेत. त्यातच आता मराठमोळी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रसिका आगाशे हिनंही स्वत:चं उदाहरण देत एक समर्पक आणि तितकाच बोलका फोटो शेअर केला आहे. रसिकानं लोकप्रिय अभिनेता मोहम्मद झिशान आयुब याच्याच्याशी लग्नगाठ बांधली होती. 

एका मुस्लिम कुटुंबाकडून त्यांच्या हिंदू सुनेच्या डोहाळजेवणाचं आयोजन करण्यात येतं, असं दाखवत एकात्मतेचा संदेश 'तनिष्क' जाहिरातीतून देण्यात आला होता. पण, सोशल मीडियावर अनेकांनीच या जाहिरातीवर निशाणा साधत ती मागे घेण्याची मागणी केली. 'तनिष्क' या ज्वेलरी ब्रँडनं त्यांची जाहिरात मागे घेतल्यानंतर रसिकानं हा फोटो शेअर केला. 

रसिकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिला कुटुंबातील मंडळी ओवाळताना दिसत आहेत. 'मेरी गोदभराई...' असं लिहित तिनं लव्ह जिहादबाबत बोलण्यापूर्वी जरा  special marriage actबाबत आपण शिकूया असं थेट शब्दांत सांगितलं. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावनेनं वक्तव्य करण्यापूर्वी काही गोष्टी नजरेत घेणं महत्त्वाचं असल्याचा सूर तिनं यावेळी आळवला. रसिकाच्या या ट्विटची बरीच चर्चाही झाली. 

फक्त रसिकाच नव्हे तर, अभिनेत्री मिनी माथूर म्हणजेच लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक कबीर खान याच्या पत्नीनंही सदर प्रकरणात तिचा स्वत:चा अनुभव शेअर केला. ज्यामध्ये तिनं आपल्या वैवाहिक जीवनात अपेक्षेहून जास्त प्रेम मिळाल्याचं सांगत आता ही द्वेषभावना दूर लोटण्याची विनंती केल्याचं पाहायला मिळालं. 

 

सोमवारी 'तनिष्क'कडून ही जाहिरात मागे घेत समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्यामुळं हा निर्ण घेच असल्याचं कारण पुढं केलं. एकत्वम् या संकल्पनेमागे विविध स्तर, जात, पंथातील व्यक्तींनी एकत्र येत क्षण साजरा करण्याचा संदेश देण्यात आला होता, असं या ब्रँडकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं गेलं होतं.