सरत्या वर्षाला निरोप देत सोनाली भावूक

सरत्या वर्षाला निरोप देत असताना अनेकांनीच २०१८ या वर्षातील आपल्या कडूगोड आठवणींना उजाळा दिला. 

Updated: Jan 1, 2019, 08:57 AM IST
सरत्या वर्षाला निरोप देत सोनाली भावूक  title=

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत असताना अनेकांनीच २०१८ या वर्षातील आपल्या कडूगोड आठवणींना उजाळा दिला. मग यात कलाकार मंडळीही मागे राहिले नाहीत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अशीच एक आठवण, सर्वांसमोर ठेवली. ज्यामध्ये बॉलिवूडची ही धीट अभिनेत्री भावूक झाल्याचं लक्षात आलं. 

२०१८ या वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी सोनालीने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिने केसांना शेवटचं ब्लो ड्राय केलं होतं. कॅन्सरच्या उपचारासाठी म्हणून केस कापण्यापूर्वीचा फोटो तिने शेअर केला. ज्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

'हा तेव्हाचा फोटो आहे, ज्यावेळी मी केस कापण्यापूर्वी शेवटचं ब्लो ड्राय केलं होतं. आता माझे केस परत येऊ लागले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये मी पुन्हा एकदा त्यांना ब्लो ड्राय करण्यासाठी आशावादी आहे. हा संपूर्ण प्रवास मला खूप खूप काही शिकवून गेला. शारीरिक क्षमतेपासून ते लढा देण्यापर्यंत सारंकाही मी अनुभवलं', असं लिहित आपल्याला आधार देणाऱ्या व्यक्तींचेही तिने आभार मानले. 

'आयुष्यात सतत हालचाली सुरूच असतात, गोष्टी येतात आणि जातात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे केस', असं लिहित येणारं वर्ष हे आरोग्यदायी आणि आनंदी जावो अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. सोनालीची ही पोस्ट वाचून अनेकांनीच कमेंट्सच्या माध्यमातून तिला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. 

जुलै २०१८  मध्ये सोनालीने आपल्याला कॅन्सर झाल्याची बाब सर्वांसमोर आणली होती. ज्यानंतर उपचारांसाठी ती बराच काळ परदेशात होती. परदेशातील कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आणि सध्या आपल्या कुटुंबासोबतच काही खास क्षण व्यतीत करत आहे.