मुंबई : द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमा प्रदर्शना आधीच बराच चर्चेत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित असल्याने याला जास्त महत्व आले आहे. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अनूपम खेर यांनी पुन्हा एकदा या सिनेमावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. या सिनेमातील आपली भूमिका सर्वात शानदार असल्याचे त्यांनी सांगितले. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर माजी पंतप्रधान मंत्री लोकांच्या मनात आपली जागा बनवतील असे अनूपम खेर यांनी म्हटले आहे.
मनमोहन सिंह यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात बारू यांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसतोय तर मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर यांनी निभावलीय. उल्लेखनीय म्हणजे, अनुपम खेर भाजपचे खंदे समर्थक मानले जातात. काँग्रेसच्या नेत्यांचा आक्षेप धुडकावून लावत अनुपम खेर यांनी 'या सिनेमात केवळ ऐतिहासिक तत्थ्यच दाखवण्यात आलेत त्यात आक्षेपार्ह काहीही नाही... सत्य कधीही बदलणार नाही' अशा शब्दांत सिनेमाचा बचाव केला.
सध्या या सिनेमावरून राजकारण सुरू आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून या सिनेमाचा ट्रेलर समोर आणलाय. एका परिवाराने 10 वर्षे देशाला कशाप्रकारे बांधून ठेवले ही काहणी सिनेमातून सांगण्यात आली आहे. 2019 च्या निवडणूकीआधी भाजपाने केलेला हा प्रोपेगेंडा असल्याचे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात येतंय. हा सिनेमा रिलीजच्या आधी आम्हाला दाखवा अशी मागणी महाराष्ट्र युवा कॉंग्रेसने केली आहे.