बॉडीगार्डसाठी श्रद्धाने मराठीतून लिहिली भावनिक पोस्ट

ही पोस्ट वाचून... 

Updated: Nov 2, 2019, 12:06 PM IST
बॉडीगार्डसाठी श्रद्धाने मराठीतून लिहिली भावनिक पोस्ट  title=

मुंबई : सेलिब्रिटी मंडळी हे त्यांच्या क्षेत्रात, विविध कामांमध्ये कितीही व्यग्र असले तरीही काही व्यक्तींसाठी आणि काही गोष्टींसाठी ते आवर्जून वेळ काढतात. अशाच एका खास व्यक्तीसाठी वेळ काढत 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर हिने त्याचे आभार मानले आहेत. 

ही खास व्यक्ती म्हणजे श्रद्धाला बॉडीगार्ड अतुल कांबळे. एक सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना चाहत्यांची अमाप गर्दी, किंवा एखाद्या ठिकाणी गेलं असता तिथे गर्दीवर नियंत्रण ठेवत या सेलिब्रिटींचा वावर अधिक सोपा करणारे हे बॉडीगार्ड कायमच महत्त्वाच्या आणि तितक्याच जबाबदार भूमिकेत दिसतात. अशा या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला म्हणजेच अतुल कांबळे याला श्रद्धाने वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

इन्स्टाग्रामवर अतुलसोबतचा फोटो पोस्ट करत तिने चक्क मराठीतून त्याला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. 'माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्यासारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो!, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

श्रद्धाने मनापासून दिलेल्या या शुभेच्छा पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही अतुलला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. इतकच नव्हे, तर आपल्यासोबत आणि आपल्यासाठी मेहनत घेणाऱ्या, काम करणाऱ्या व्यक्तीप्रती तिची ही वागणूकही सर्वांचं मन जिंकून गेली आहे.