मुंबई : प्रेमाच्या प्रवासात अनेकदा आपण एका अशा वळणावर येतो, ज्या वळणावरून पुढे सहजीवनाचा मार्ग निवडण्याची वेळ येते. गेल्या कही दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका सेलिब्रिटी जोडीनंही हे अनुभवलं. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणित त्यांचं नातं आणखी खुलत होतं. इतकंच काय, तर आता ही जोडी लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीलाही लागली होती.
यंदाच्याच वर्षी बॉलिवूडच्या कपूर कुटुंबात लग्नाच्या सनई चौघड्यांचे सूर घुमणार होते. पण, आता मात्र यातलं काहीच होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. (Shradha Kapoor rohan shreshtha breakup)
ही बातमी कपूर कुटुंबासोबतच चाहते आणि बॉलिवूड जगतालाही हादरवून गेली आहे.
चार वर्षांचं नातं तुटलं...
श्रद्धानं भलेही तिचं आणि रोहनचं नातं जाहिरपणे स्वीकारलं नाही, पण त्यांच्यात असणारी ‘खास’ मैत्री खूपच बोलकी ठरली. हे दोघंही एकमेकांना महाविद्यालयीन दिवसांपासून ओळखत आहेत.
इतकंच काय, तर आता त्यांनी लग्नाचा निर्णय़ही घेतल्याचं कळलं. पण, आता मात्र त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी महिन्यापासूनच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
श्रद्धाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी रोहन गोव्यातही अनुपस्थित होता. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अखेर हा मोठा निर्णय घेत आता अखेर आपआपले वेगळे मार्ग निवडले आहेत.
अद्यापही त्यांच्यामध्ये ब्रेकअप का झालं यामागचं कारण समोर येऊ शकलेलं नाही. पण, प्रेमाच्या या प्रवासाच जिथं नव्या सुरुवातीची स्वप्न पाहिली जातात तिथंच पोहोचून विभक्त होण्याचं दुर्दैव कोणाच्याही नशिबी येऊ नये हेच खरं....