मुंबई : काही चित्रपट हे अनेक गोष्टींना अपवाद ठरतात. प्रदर्शित होण्याच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांची जादू कायम टीकून असते. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा 'कुछ कुछ होता है'. आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच, १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. मैत्री आणि प्रेम या दोन विषयांना अतिशय सुरेखपणे हाताळत 'कुछ कुछ होता है'ने प्रेक्षकांवर अशी काही जादू केली, 'प्यार दोस्ती है' ही बाब अनेकांची सहमती मिळवून गेली.
'अंजली', 'टीना' आणि 'राहुल' अशा तिघांच्या जीवनाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरलं होतं. ज्यामध्ये सहायक कलाकारांच्या भूमिका तितक्याच प्रभावी ठरल्या. अर्चना पूरण सिंग, अनुपम खेर, फरिदा जलाल आणि बालकलाकार सना सईद यांनी चित्रपटात साकारलेली पात्रही विशेष लक्ष वेधून गेली.
'हॅलो, पापा को फोन दो....', असं अतिशय गोड अंदाजात टेलिफोन ऑपरेटरला सांगणाऱ्या छोट्या 'अंजली'ने तर या चित्रपटात खरी रंगत आणली होती. ही भूमिका साकारणारी सना सईद हिची या भूमिकेसाठी एक दोन नव्हे तर, तब्बल २०० मुलींमधून निवड करण्यात आली होती. बऱ्याच चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत झळकणाऱ्या सनाने २०० मुलींमध्येही तिचं वेगळेपण सिद्ध करत ही भूमिका मिळवली होती.
पुढे, सना 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातूनही झळकली होती. फक्त सनाच नव्हे, तर या चित्रपटातील सलमानने साकारलेला 'अमन', जॉनी लिव्हर यांनी साकारलेला 'अल्मेडा', सतत तारे मोजणारा छोटा सरदार, इतकच नव्हे तर ग्लॅमरस अंदाज असणारी सूत्रसंचालिका 'नीलम'ही 'कुछ कुछ होता है'च्या कथानकाला सुरेख जोड देऊन गेले.
सलमानने हा चित्रपट अगदी काही मिनिटांची भूमिका असतानाही स्वीकारला होता. यामागे कारण होतं ते म्हणजे करण जोहरच्या वडिलांप्रती असणारं त्याचं प्रेम आणि आदर. सलमान उत्साहात या चित्रपटाशी जोडला गेला होता. ज्यानंतर चित्रीकरणाच्या दरम्यान त्याने करणला काही दृश्यांच्या वेळी चौकटीबाहेरच्या कल्पनाही सुचवल्या होत्या. पण, करणला सलमानच्या या वागण्याचा धक्काच बसला. अखेर रडवेल्या चेहऱ्याने मोठ्या तरबेजपणे त्याने सलमानकडून ती भूमिका सुरेखपणे निभावून घेतली. असंख्य आठवणी, शिकवण, मैत्री, प्रेम आणि कलाकारांची साथ या साऱ्याच्या बळावर 'कुछ कुछ होता है' साकारण्य़ात आला आणि कायमस्वरूपी प्रेमाची परिभाषाच बदलून गेला.