करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं!

Kareena Kapoor South Debut : या चित्रपटात साई पल्लवी, राशी खन्ना या अभिनेत्री झळकतील, अशी चर्चा सुरु होती. पण अखेर यात करीना कपूर झळकणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.   

Updated: Jan 4, 2024, 05:24 PM IST
करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं! title=

Kareena Kapoor South Debut : बॉलिवूडची बेबो अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणून करीना कपूर-खानला ओळखले जाते. करीना कपूरच्या अभिनयाचे सर्वजण चाहते आहेत. करीना कपूरने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रिफ्यूजी' चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'कभी खुशी कभी गम', 'जब वी मेट', 'बजरंगी भाईजान', 'बॉडीगार्ड', 'थ्री इडियट्स' यासारख्या अनेक चित्रपटात झळकली. आता करीना कपूर ही चक्क दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. 

'फिल्मफेअर' या न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, करीना कपूर ही लवकरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. करीना ही केजीएफ स्टार यशसोबत कन्नड चित्रपटात झळकणार आहे. 'टॉक्सिक' असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. 

'टॉक्सिक' हा करीना कपूरचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पदार्पणाचा पहिला चित्रपट असणार आहे. येत्या काही आठवड्यात या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे. 'टॉक्सिक' या चित्रपटात नक्की कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दल विविध तर्क-वितर्क पाहायला मिळाले होते. या चित्रपटात साई पल्लवी, राशी खन्ना या अभिनेत्री झळकतील, अशी चर्चा सुरु होती. पण अखेर या चित्रपटात करीना कपूर झळकणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच 'टॉक्सिक' या चित्रपटाचा पहिला व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. या व्हिडीओत यशचा पहिला लूक समोर आला होता. यात तो खांद्यावर मशीन गन, तोंडात सिगारेट घेऊन पाहायला मिळाला होता. त्याच्या या लूकची प्रचंड चर्चा रंगली होती. 

'टॉक्सिक' हा चित्रपट ड्रग्ज या विषयावर आधारित असणार आहे. यात यश हा डॅशिंग भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करणार आहेत. या चित्रपटात यश, करीना कपूर यांच्याबरोबर कोणकोणते कलाकार झळकणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.