Manikarnika | Movie Review : राणी कंगनानेच साकारावी, पण...

'देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिये; मै रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिये....'

Updated: Jan 25, 2019, 08:47 AM IST
Manikarnika | Movie Review : राणी कंगनानेच साकारावी, पण...  title=

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 
दिग्दर्शक : कंगना रानौत, राधा कृष्ण जगरालमुडी 
निर्माते : झी स्टुडिओ, कमल जैन
संवाद आणि गीते : प्रसून जोशी 
मुख्य भूमिका : कंगना रानौत, जिसू सेनगुप्ता, अतुल कुलकर्णी, डॅनी डँग्जोपा, अंकिता लोखंडे
संगीत दिग्दर्शन  (गीते): शंकर-एहसान-लॉय
पार्श्वसंगीत : संचित बलहारा, अंकित बलहारा

Manikarnika: The Queen of Jhansi
'तुमची मुलगी दीर्घायुषी असेल की नाही हे सांगता येणार नाही, पण ती इतिहासात अमर असेल...', अशा आशीर्वादाने या जगात आलेल्या एका चिमुरडीने पुढे जाऊन मातृभूमीच्या, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. ती पराक्रमी वीरांगना म्हणजे मणिकर्णिका, मनू, झाँशीची राणी लक्ष्मीबाई. 

इतिहासाच्या अभ्यासक्रमात भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा जेव्हा जेव्हा उल्लेख झाला तेव्हा झाशीच्या राणीच्या पराक्रमाची गाथा गायली गेली. त्याच पराक्रमाला अवघ्या काही तासांच्या चित्रपटातून साकारण्याचं शिवधनुष्य राधा कृष्ण जगरालमुडी आणि अभिनेत्री कंगना रानौत यांनी पेललं. खुद्द कंगना यात राणी लक्ष्मीबाई यांच्या व्यक्तीरेखेत सर्वांसमक्ष आली आणि राणीची भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली होती की काय? हा प्रश्न सर्वांना पडला. किंबहुना राणी तिनेच साकारावी हे त्यावरचं उत्तरही सापडलं. बिठुरमध्ये पेशवांच्या संस्कारांमध्ये संगोपन झालेल्या, क्षत्रिय नसूनही एखाद्या मुरब्बी योद्ध्याप्रमाणे वावरणाऱ्या मणिकर्णिकेचा झाशीच्या राणीपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर स्वातंत्र्यसंग्रामातील धगधगती मशाल इथवरचा प्रवास 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटात साकारण्यात आला आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कथेची पार्श्वभूमी चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्या कानांवर पडते, चित्रपटातील बऱ्याच दृश्यांमध्ये योद्ध्याचं काळीज असणारी व्यक्तीरेखा साकारणारी कंगना रानौत प्रशंसेस पात्र ठरते. या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने जिंकते. अविश्वसनीय साहस, देशाभिमान, डोळ्यातील क्रोधाग्नी, त्याआड दडलेली मातृत्वाची भावना, पत्नी म्हणून मनात होणारा कोलाहल आणि एक राणी म्हणून खांद्यावर असणारी जबाबदारी असे सर्व धागे चित्रपटात कंगनाने एकत्र आणले आहेत. पती, राजा गंगाधर राव यांच्या निधनानंतर केशवपनाचा विरोध करण्यापासून झाशीच्या हितासाठी सिंहासनावर आरुढ होण्याची दृश्यं अंगावर काटा आणतात. 

चित्रपटात कंगनाला साथ मिळाली आहे ती म्हणजे सहकलाकारांची. जिसू सेनगुप्ता (गंगाधर राव), अतुल कुलकर्णी (तात्या टोपे), अंकिता लोखंडे (झलकारीबाई), डॅनी डँग्जोपा (गुलाम गौस खान) यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखा सुरेखपणे बजावल्या आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध जास्त वेळखाऊ असल्याचं वाटतं. त्यात काही गीतं आणि संवादही खटकतात. तर, उत्तरार्धात बऱ्याच अंशी चित्र बदलतं, रणसंग्रामातील राणी कशी होती, याचा आधार घेत कथानक वेग पकडतं. शंकर- एहसान- लॉय या त्रिकूटाने 'मणिकर्णिका...'तील गीतांना संगीत दिलं  आहे, पण, 'देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिये; मै रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिये....' हे गीत वगळता इतर गाणी फारशी स्मरणात राहत नाहीत. पार्श्वसंगीताचं म्हणावं तर संचित बलहारा, अंकित बलहारा यांनी ऐतिहासिक कथानकाच्या दृष्टीने संगीताची चांगली जोड चित्रपटाला दिली आहे. 

काही खटकणारी दृश्यं, तुलनेने फारसे प्रभावी नसणारे संवाद या गोष्टी वगळल्या तर कंगनाचा अभिनय आणि राणीच्या रुपात तिचं पडद्यावर दिसणं या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. त्यामुळे 'मेरी झाँसी नही दूँगी', असं ठणकावून सांगणाऱ्या त्या वीरांगनेसाठी हा चित्रपट एकदा पाहाच.  .

- सायली पाटील
SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com