...म्हणून 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या नावात मोठा बदल

 चित्रपटात काही किरकोळ बदल सुचवत...

Updated: Jun 30, 2019, 03:11 PM IST
...म्हणून 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या नावात मोठा बदल  title=

मुंबई : कंगना रानौत आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या मेंटल है क्या या आगामी चित्रपटाच्या नावात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. 'मिड डे'ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बालाजी टेलिफिल्म्सच्या प्रवक्त्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. सोबतच महत्त्वाची माहितीही देण्यात आली. 

'मेंटल हेल्थ' अर्थात मानसिक स्वास्थ्य आणि या प्रकरणाचं एकंदर गांभीर्य पाहता आम्ही कोणाच्याही भावना दुखावू इच्छित नाही किंवा तसा आमचा हेतूही नव्हता, असं संबंधित प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. सोबतच त्यांनी चित्रपटाच्या नावात बदल केल्याची माहिती देत आता हे नाव 'जजमेंटल है क्या' असं करण्यात आल्याचं सांगितलं. 

सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटात काही किरकोळ बदल सुचवत यू/ए प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या बदलांसह आता हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुरुवारी खुद्द कंगना रानौतनेच चित्रपटाच्या नावात काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

Indian Psychiatric Society (IPS) या संस्थेकडून कंगना आणि राजकुमारच्या मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता. ज्या धर्तीवर त्यांच्याकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात येण्याविषयी सेन्सॉर बोर्ड़ाला एक पत्र लिहिण्यात आलं होतं. Mental Health Care Act, 2017 चं बऱ्याच अंशी उल्लंघन केल्याची बाब यात अधोरेखित करण्यात आली होती. एकता कपूर हिनेही ट्विट करत 'मेंटल है क्या' या चित्रपटातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याची बाब स्पष्ट केली होती.