अहो.... ऐकलं का? रणवीरला दीपिकाने लावलं कामाला

हा तिने दिलेला हुकूमच म्हणा.... 

Updated: Jan 27, 2020, 02:17 PM IST
अहो.... ऐकलं का? रणवीरला दीपिकाने लावलं कामाला title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या नात्याने कायमच अनेक जोडप्यांना #CoupleGoals देण्याचं काम केलं आहे. एकमेकांच्या साथीने नात्यांचे बंध जपत असतानाच कामाच्या क्षेत्रातही प्रगती करण्यासाठी रणवीर आणि दीपिकाने कायमच एकमेकांना प्रोत्साहन दिलं आहे. सध्या ही सर्वांची लाडकी जोडी पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्यात सोशल मीडियावर झालेला अफलातून संवाद. 

रणवीर सध्या त्याच्या '`८३' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. असं असतानाच त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटोही पोस्ट केले. ज्यामध्ये आपण चेन्नईमध्ये असल्याचं त्याने सांगितलं. रणवीरने पोस्ट केलेल्या या फोटोंना लगेचच हजारो नेटकऱ्यांनी लाईक केलं. त्याच्या पत्नीने म्हणजेच दीपिकाने तर, थेट त्या फोटोवर कमेंट करत ती अस्सच 'बायको'च्या भूमिकेत आल्याचंच पाहायला मिळालं. 

सहसा पती किंवा पत्त्नीपैकी कोणी कुठे गेलं असेल, तर साथीदाराकडून त्या ठिकाणहून परत येत असताना अमूक आण, तमूक आण असं सांगण्यात येतं. अगदी त्याचप्रमाणे दीपिकाने रणवीरला काही गोष्टी आणण्याचा जणू हुकूमच दिला. चित्रपटातील कलाकारांसोबतच्या फोटोवर कमेंट करत दीपिकाने लिहिलं, 'श्रीकृष्ण या दुकानातून १ किलो मैसूर पाक आणि हॉट चिप्समधून २, अडीच किलो तिखट असे बटाट्याचे वेफर्स घेतल्याशिवाय परत येऊ नकोस '. दीपिकाचे हे शब्द म्हणजे फक्त कमेंट्स नसून, पतीला दिलेला हुकूमच आहे. तेव्हा आपल्या लाडक्या पत्नीची ही फर्माइश रणवीर पूर्ण करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

रणवीर सिंग, येत्या काळात कबीर खान दिग्दर्शित '`८३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. ज्यामध्ये रणवीर ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दीपिकाही या चित्रपटातून रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. या दोघांशिवाय इतरही काही प्रसिद्ध चेहरे क्रिकेटपटूंच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.