शाहरुख, गौरी खानच्या अडचणीत वाढ

EDमुळे अडचणी वाढण्याची शक्यता 

Updated: Feb 6, 2020, 07:08 PM IST
शाहरुख, गौरी खानच्या अडचणीत वाढ  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, अभिनेत्री जूही चावला, जय मेहता यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालय, म्हणजेच ईडीकडून रोझव्हॅली चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तीन कंपन्यांची जवळपास ७० कोटींहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त केली आहे. 

संपत्ती जप्त केलेल्या या कंपन्यांमध्ये मल्टीपल रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंट झेवियर्स महाविद्यालय, केकेआर स्पोर्ट्स आणि इतरही काहींचा समावेश असल्याचं कळत आहे. 

ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध व्यक्ती आणि त्यांच्या कंपनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत ज्यांना रोझव्हॅली या समुहाकड़ून फंड मिळत होता. शिवाय तीन कंपन्यांची बँक खातीसुद्धा गोठवण्यात आली आहेत. ज्यांमध्ये १६.२० कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. 

जप्त करण्यात आलेल्या या संपत्तीशिवाय, पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रामनगर आणि महीशदल येथे असणारी २५ एकरांची जमीन, मुंबईतील दिलकाप चेंबर्समध्ये असणारा फ्लॅट आणि रोझव्हॅली समूहाचं एक हॉटेलही ताब्यात घेण्यात आलं आहे. कोलकात्याच्या संघाशी संलग्न काही व्यक्तींनी नाव जाहीर न करता दिलेल्या माहितीनुसार शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. रोझव्हॅलीशी जे काही करार करायचे होते, के प्रायोजकतेच्या करारांशीच संबंधीत होते. तेव्हा आता या सर्व प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.