मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसची लाट भारतात धडकली तेव्हा अगदी सुरुवातीच्याच काळापासून देशात प्रतिबंधात्मक उपाय राबवले गेले. ज्याअंतर्गत देशभरात लॉकडाऊन, अर्थात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेक व्यवहारांची गती लक्षणीयरित्या मंदावली. अगदी कलाविशअवही याला अपवाद राहिलं नाही. परिणामी अनेकांनीच यादरम्यानचा काळ आपल्या परिनं व्यतीत करण्याला प्राधान्य दिलं. कलाविश्वाचा झगमगाट, अभिनय या साऱ्यापासून खुद्द सलमान खानही दूर गेला आणि त्यानं थेट पनवेल येथील फार्महाऊस गाठलं.
काही महिन्यांपासून सलमान येथेच रमला असून, निसर्गाच्या सानिध्ध्यात आता तो बहुविध कामं करण्याला प्राधान्य देत आहे. त्यानं नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्ट हेच सांगत आहे. चेहऱ्यावर सुरेख असं हास्य, पिळदार शररीयष्टी अशा एकंदर रुपात सलमान कोणा एका चित्रपटाच्या सेटवर किंवा फोटोशूटसाठी उभा नसून, त्यानं थेट शेताची वाट धरली आहे.
आपल्या दोन्ही हातांमध्ये पिकाच्या लोंब्या घेत बी- टाऊनचा हा भाईजान शेतीच्या कामांमध्ये रमला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर शेतीकामात रमणाऱ्या सलमानचं हे रुप चाहत्यांचीही मनं जिंकत आहे. या पोस्टसह त्यानं, 'दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम.... जय जवान जय किसान!', असं कॅप्शनही लिहिलं आहे. त्याचा हा एकंदर अंदाज पाहता 'वाह मिया, कमाल हो आप' अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली आहे.