'माझ्या कुटुंबातील महिलांच्या वाट्याला जाण्याचं कोणाचं धाडस नाही'

जाणून घ्या 'तो' नेमकं म्हणालाय तरी काय...  

Updated: Oct 28, 2018, 09:56 AM IST
'माझ्या कुटुंबातील महिलांच्या वाट्याला जाण्याचं कोणाचं धाडस नाही' title=

मुंबई : #MeToo प्रकरणी फक्त पीडितच नव्हे तर आता इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि त्या दुष्कृत्यांना फोडली जाणारी वाचा या साऱ्याला सध्या पूरक वातावरण मिळताना दिसत आहे. 

ही मोहिम अशीच सुरु रहावी असं खुद्द सेलिब्रिटींनाही वाटू लागलं आहे. बी- टाऊनचा नवाब, अभिनेता सैफ अली खान याने याविषयी आपलं मत मांडलं आहे. 

'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सैफची लाडकी लेक सारा अली खान सध्या कलाविश्वात पदार्पण करणार आहे. पण, त्याआधीच उठलेलं हे वादळ पाहता एक वडील म्हणून त्याच्या मनात चिंता असणारच असा अनेकांचा समज. सैफचा मात्र या साऱ्याविषयी एक वेगळाच दृष्टीकोन आहे. 

आपल्या कुटुंबातील महिलांशी चुकीच्या पद्धतीने वागण्याचं कोणाचं धाडस नाही, असं सैफचं मत आहे. 

'आपल्या समाजात बऱ्याच गोष्टी असमान आहेत. मला नाही वाटत की, माझ्या आप्तेष्टांशी कोणी चुकीच्या पद्धतीने वागेल. अशा बोलण्यामागचं नेमकं कारण मला सांगता येणार नाही. पण माझी आई, बहीण किंवा पत्नी कोणीही असो. त्यांच्याशी गैरवर्तणूक करण्याचं धाडस कोणात नाही', असं तो म्हणाला. 

कुटुंबाती महिलांभोवती एक प्रकारचं अदृश्य असं सुरक्षा कवच असून, ते कोणत्याही रुपात असून सकतं हा विचार त्याने मांडला. याच काणामुळे त्यांच्याशी कोणी चुकीच्या पद्धतीने वागत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.

महिलांच्या दृष्टीने सुरक्षित अशा वातावरणाची निर्मिती केलीच गेली पाहिजे, ही बाब त्याने अधोरेखित केली. 

येत्या काळात #MeToo ही चळवळ अशीच सुरु राहिली पाहिजे, अशी आशाही त्याने व्यक्त केली. या एका मोहिमेमुळे/ चळवळीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्याचं मतही त्याने मांडलं.