83 Movie First Review : क्रिकेटमधील ऐतिहासिक विजय पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा, डोळ्यांत पाणी...

पाहा चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू   

Updated: Dec 17, 2021, 12:37 PM IST
83 Movie First Review : क्रिकेटमधील ऐतिहासिक विजय पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा, डोळ्यांत पाणी...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

83 First Review Out: क्रिकेट या खेळाला भारतात बरंच प्रेम, राजाश्रय सारंकाही मिळालं आहे. एखाद्या देवतेप्रमाणं या देशात खेळाडूंना अक्षरश: पुजलं जातं. या साऱ्या परिस्थितीवर आणि क्रिकेट जगतातील भारताच्या उल्लेखनीय अशा ऐतिहासिक विजयावर भाष्य करणारा चित्रपट '`83' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कला जगतातील काही मंडळींनी हा चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे. 

दिग्दर्शक कबीर खान याच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेल्या चित्रपटाला सध्या सर्वांकडून 'कमाल' इतकीच प्रतिक्रिया देण्यात येत आहे. 

कबीर खानच्या पत्नीनं म्हणजेच अभिनेत्री मिनी माथूर हिनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून काही रिव्ह्यूंचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

रिव्ह्यू वाचून आतापासूनच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणी हा चित्रपट अंगावर काटा उभा करतो, तर कोणी डोळ्यांत पाणी आणतो अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली आहे. 

कलाकारांच्या अभिनयापासून ते अगदी दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती यावेळी समोर आली आहे. 

क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या एका अतिशय धमाकेदार विजयाची गोष्ट कबीर खाननं या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे सादर केली आहे. 

अभिनेता रणवीर सिंग यामध्ये संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर, दीपिका ही त्यांच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. 

चित्रपटाचं संगीत आणि संवादही त्याच ताकदीचे असल्याचं रिव्ह्यू देणाऱ्यांनी सांगितलं आहे. 

मुख्य म्हणजे रणवीर चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेमध्ये असला तरीही संघातील खेळाडू म्हणून दाखवण्यात आलेले इतर कलाकारही त्यांच्या अभिनयानं चित्रपटाला चार चाँद लावताना दिसत आहेत.