नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नसराईच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. डिसेंबरमध्ये दोन मोठ्या सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
चाहतेही या लग्नासाठी उत्सुक दिसले. पण, आता मात्र एका भलत्याच गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा लग्नसोहळा आहे अभिनेता राजकुमार राव आणि त्याची प्रेयसी, अभिनेत्री पत्रलेखा यांचा.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार राजकुमार आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा सध्या चंदीगढमध्ये पार पडत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा विवाहसोहळा अतिशय खासगी स्वरुपात पार पडणार आहे. त्यांनी फक्त आणि फक्त निवडक पाहुण्यांनाच निमंत्रण दिलं आहे. कलाविश्वातून यात फार कमीच चेहरे दिसतील असं म्हटलं जात आहे.
लग्नाबाबतची ही सर्व माहिती समोर आलेली असली, तरीही पत्रलेखा आणि राजकुमारनं मात्र याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळं 10 वर्षांच्या नात्यानंतर आता ही जोडी खरंच विवाहबंधनात अडकली तर चाहत्यांनाही आनंदच असेल तर यावर वावगं काहीच नाही.