मुंबई: #MeToo चळवळीचा हा विषय आता फक्त कलाविश्वापुरताच मर्यादित राहिला नसून, त्याविषयी आता इतरही क्षेत्रातील अनेकांनीच याविषयी खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनीही अशा काही प्रसंगांविषयीचे आपले अनुभव सांगितल्याचं आता पाहायला मिळत आहे.
अभिनेता सैफ अली खान याने आपलं शोषण झाल्याचं म्हणत हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं.
सैफ मागोमाग आता आणखी एका अभिनेत्याने त्याच्यासोबत झालेल्या अशाच एका प्रसंगाविषयी खुलासा केला आहे. त्या अभिनेत्याचं नाव आहे, साकिब सलीम.
अभिनेत्री हुमा कुरेशीचा भाऊ साकिब याने सध्या कलाविश्वात स्वत:ची वेगळी अशी ओळख प्रस्थापित केली आहे. पण, त्याला सुरुवातीच्या काळात एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.
माध्यमांशी #MeToo विषयी चर्चा करत साकिब म्हणाला, '२१ वर्षांचा असतेवेळी एका माणसाने माझं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने स्वत:चे हात माझ्या पँटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता.'
साकिबसोबत असं गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे या कलाविश्वात खूप चांगले आणि प्रसिद्ध चेहरे मित्र आहेत. याविशषयी पुढे तो म्हणाला, 'ज्यावेळी माझ्यासोबत हे सर्व घडत होतं तेव्हा मी त्या माणासाला एका झटक्यात दूर केलं. त्याला आपल्या कामापुरताच सीमीत राहण्यास सांगून मी तेथून निघालो. त्यावेळी मी खुप जास्त घाबरलो होतो.'
लैंगिक शोषणाचा सामना हा फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही करावा लागतो. ज्याविषयी आता अनेकजण खुलेपणाने बोलू लागले आहेत.
सध्या सुरु असणारं हे सर्व प्रकरण आणि समोर येणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना या साऱ्याबद्दल ऐकून, वाचून मन खिन्न होतं असं तो म्हणाला.