आई- बहिणीचा उद्धार का? ट्रोलर्सना सुनील ग्रोवरचा सवाल

मुलाखतीत व्यक्त केली खंत

Updated: Sep 2, 2020, 01:22 PM IST
आई- बहिणीचा उद्धार का? ट्रोलर्सना सुनील ग्रोवरचा सवाल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विनोदी कार्यक्रम आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेता आणि विनोदवीर अशी ओळख असणाऱ्या सुनील ग्रोवर यानं नेटकऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यावर अखेर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाणं हे सुनीलसाठी नवं नाही. किंबहुना कामावर टीका केली जाणं त्याला स्वीकारार्हसुद्धा आहे. पण, अशा वेळी टीका करण्याच्या आणि खिल्ली उडवण्याच्या नावाखाली केली जाणारी शिवीगाळ मात्र आपल्याला रुचत नसल्याचं त्यानं एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. 

ईटाईम्सशी संवाद साधताना सुनील म्हणाला, 'माझी खिल्ली उडवली जात असल्यामुळं मला कोणताही फरक पडत नाही. माझ्याविषयी तुमचं काय मत आहे, याचा मला काही फरक पडत नाही. कारण प्रत्येकजणच त्यांची मत नोंदवत असतो. आपण कितीही काही सांगायचा प्रयत्न केला तरी लोकं तुम्हाला खोटंच ठरवणार. पण, एका अर्थी हे फार नकारात्मक आहे. अनेकजण तर फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करतात. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही तुम्ही ते थेट सांगा, टीका करा. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगताना वाक्याची सुरुवात ही आई आणि बहिणीवरुन शिवीगाळ करतच का केली जाते? त्यांच्यावरुन शिवीगाळ का?”

आई, बहिणीवरुन शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्या अशाच ट्रोलर, नेटकऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, तर आपण खऱ्याखुऱ्या टीकेची आणि नकारात्मक प्रतिक्रियांची दखलही घेत असल्याची बाब त्यानं स्पष्ट केली. 

 

सध्या सुनील 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. यामध्ये तो विविध पात्र साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. उपासना सिंग, शिल्पा शिंदे, सुगंधा मिश्रा आणि इतर कलाकारही त्याच्यासह या कार्यक्रमातून झळकतात.